Pune: २४ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञावर गुन्हा, एसीबीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 11:53 AM2024-02-15T11:53:04+5:302024-02-15T11:53:54+5:30
याप्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती....
पुणे : इमारतीत नवीन वीजजोडणीसाठी स्थळपाहणी अहवालात त्रुटी न ठेवण्यासाठी २४ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरण तंत्रज्ञाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. योगेश गोकुळ पाटील असे लाचखोर तंत्रज्ञाचे नाव आहे. याप्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी एका इमारतीचे नूतनीकरण केले आहे. त्या इमारतीमध्ये वीजपुरवठा मीटर कमी पडत होते. यामुळे नवीन ४ वीज मीटर कनेक्शन जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला होता. तंत्रज्ञ योगेश पाटील याने स्थळपाहणी अहवालात त्रुटी न ठेवण्यासाठी एका मीटरसाठी ६ हजार असे चार मीटरसाठी २४ हजार रुपयांची मागणी केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पंचांसमक्ष पडताळणी केली. योगेश पाटीलने २४ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पाटीलवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलिस हवालदार सरिता वेताळ आणि पोलिस शिपाई दिनेश माने यांनी ही कारवाई केली.