आदिवासी भागात घरे शाकारण्याच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:45+5:302021-06-01T04:08:45+5:30
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाळ्याची चाहूल लागली आहे. भातपिकाच्या पेरणीबरोबरच पावसाळ्यापूर्वीची इतर कामे आटोपण्यात या भागातील शेतकरी ...
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाळ्याची चाहूल लागली आहे. भातपिकाच्या पेरणीबरोबरच पावसाळ्यापूर्वीची इतर कामे आटोपण्यात या भागातील शेतकरी मग्न आहे. आहुपे, कोंढवळ, पाटण या दुर्गम खोऱ्यांत काही शेतकऱ्यांनी भातपेरणी करण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच या भागात दरवर्षी केले जाणारे काम म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची डागडुजी करणे. ही कामे कोकणापासून ते थेट सह्याद्रीच्या पर्वतरांगात पसरलेल्या घाटमाथ्यावर सर्वत्र केली जातात. स्थानिक भाषेनुसार याला वेगवेगळी नावे असली तरी सर्वांचा उद्देश मात्र पावसाळ्यातील चार महिने घरांचे संरक्षण व्हावे हाच आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची कौले बदलणे, त्यांच्या झडपांमधून पाणी येणार असेल तर त्या ठिकाणी नवीन कौले किंवा प्लॅस्टिकचा कागद टाकून त्यावर गवत टाकून या झडपा बंद केल्या जातात. कोकण व घाटमाथ्यावरील अतिपावसाच्या भागात घरांचा आकार चौमवळी स्वरूपाचा असतो. सतत दिवसरात्र जोरात कोसळणाऱ्या पावसाचे पाणी जलदगतीने खाली उतरण्यासाठी या प्रकारची घरे बांधली जातात. घराच्या भोवताली एका विशिष्ट प्रकारच्या झुडपापासून मिळणाऱ्या झावळ्यांनी घरे शाकारली जातात. यामुळे अतिपाऊस व जोरदार वाऱ्याच्या सटकाऱ्यापासून घराच्या भिंतींचे संरक्षण होते. घरे शाकारणीमुळे पावसाळ्याचे चार महीने कितीही पाऊस झाला तरी घराची ऊब कायम रहाते. आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात सध्या पावसाळ्यापूर्वीच्या शेतीच्या मशागतीच्या कामांसोबतच घरे शाकारणीच्या कामांनीही वेग घेतला असून, आहुपे, पाटण खोऱ्यात ही कामे उरकण्यासाठी लगबग सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पावसाळ्याची चाहूल लागली असून, शेतीच्या कामांसोबतच घरे शाकारणीच्या कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.(छायाचित्र-कांताराम भवारी)