कुरुळी परिसरात भातलावणीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:09+5:302021-07-27T04:10:09+5:30
भातरोपे लावणी योग्य झाल्याने त्या रोपांची लावणी आता होणे गरजेचे आहे. परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत असून या ...
भातरोपे लावणी योग्य झाल्याने त्या रोपांची लावणी आता होणे गरजेचे आहे. परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत असून या होणाऱ्या पावसाने सखल भागात पाणी साचू लागले आहे. तसेच सखल भागात शेतात साचलेले पाणी शेतकऱ्यांनी अडवून त्यामध्ये भातलावणी करण्यास सुरुवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी विहीर, बोरवेल कृषिपंपाच्या पाण्यावर भातलावणी सुरू केली आहे.
तब्बल दीड महिन्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे. पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, मका, भुईमूग, वाल, पिकांची वाढ खुंटली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. पण पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांनी पिकांना रासायनिक खतांची मात्रा घालण्यास सुरुवात केली आहे. घरातील लहान मुलांपासून वृद्ध मंडळीदेखील कामाला लागली आहे. तसेच सोयाबीन पिकांची कोळपणी, खुरपणीदेखील शेतकऱ्यांनी हाती घेतली आहे.
कुरुळी परिसरात पावसाच्या आगमनाने भात लावणी सुरू झाली आहे.