पुणे-मिरज लोहमार्गाच्या कामाला गती; सहा महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:36 AM2024-03-01T10:36:41+5:302024-03-01T10:37:31+5:30
सध्या कऱ्हाड ते सांगली दरम्यान सुमारे ४० किलोमीटर दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे....
पुणे :पुणे-मिरज या २८० किमी लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या २१३ किलोमीटर पूर्ण झाले आहे. उर्वरित ६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी सहा महिने कालावधी लागणार आहे. तयार झालेल्या २१३ किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. उर्वरित ६७ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट्ये आहे.
या मार्गावरून प्रवास जलद आणि सुखकर होण्यासाठी प्रवाशांना आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार असून, लोहमार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठांकडून सतत दौरे करून कामाचा वेळेवर आढावा घेण्यात येत आहे तसेच प्रमुख अडथळे हटवल्याने कामाची गती वाढली आहे. त्यामुळे सहा महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
६७ किलोमीटरचे काम वेगात सुरू :
सध्या कऱ्हाड ते सांगली दरम्यान सुमारे ४० किलोमीटर दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. तारगाव ते शिरवडे हा १८ किलोमीटर मार्ग सुरू झाल्याने पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या २८० किलोमीटरपैकी २१३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ६७ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससह अन्य जादा रेल्वे गाड्या धावतील.
आकडे काय सांगतात?
लोहमार्गाची एकूण लांबी - २८० कि.मी.
दुहेरीकरण झालेला मार्ग - २१३ कि.मी.
काम सुरू असलेले मार्ग - ६७ कि.मी.
प्रकल्पाचा एकूण खर्च - २४३६ कोटी
प्रकल्पाची सुरुवात - २०१७