पावसाच्या हजेरीने राज्यात भातलावणीस वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:23+5:302021-07-21T04:09:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पावसाने भातक्षेत्रात हजेरी लावल्याने रोपांच्या पुनर्लागवडीस राज्यात वेग आला आहे. पाऊस उशिरा सुरु झाल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पावसाने भातक्षेत्रात हजेरी लावल्याने रोपांच्या पुनर्लागवडीस राज्यात वेग आला आहे. पाऊस उशिरा सुरु झाल्याने भाताचे क्षेत्र कमी होण्याची चिन्हे असून लावणीही ऑगस्टपर्यंत चालेल असे दिसते आहे.
मागील आठवड्यापर्यंत पावसाने ओढ दिली होती. राज्यातील भाताचे क्षेत्र २ लाख ९६ हजार हेक्टर आहे. कोकण विभाग, तसेच पुणे विभाग तसेच भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातही भात पीक घेतले जाते. पाऊस वेळेवर सुरु झाला असता तर जुलैअखेरपर्यंत भात लावणी पूर्ण होते. मात्र पाऊस लांबला व लावणी लांबणीवर पडली.
रोपवाटिकेतील भात रोपे काढावीत की न काढावीत या चिंतेत शेतकरी असतानाच पावसाने हजेरी लावली. कोकण तसेच अन्य भात क्षेत्रात पाऊस पडल्याने खाचरांमध्ये आता पाणी भरले आहे. त्यामुळे भात रोपांची पुनर्लागवड वेगात सुरु झाली आहे. रोपवाटिकेतून रोपे काढून ती खाचरात लावण्यात येत आहेत.
राज्यात एकूण ५० टक्केपेक्षा जास्त भात क्षेत्रात पेरणी झाली आहे. उशीरा सुरु झाल्याने आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लावणी सुरु राहील. राज्याचे भात क्षेत्र पावसाच्या विलंबामुळे साधारण ५ टक्के कमी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही ५० टक्के भातलावणी पुर्ण झाली आहे. जिल्ह्याचे एकूण भात क्षेत्र ६१ हजार हेक्टर आहे. मावळ, जुन्नर, खेड, वेल्हे, पुरंदरचा काही भाग इथे भात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. या क्षेत्रातही आता रोपांच्या पुनर्लागवडीने वेग घेतला आहे.