आदिवासी क्षेत्रात पाणी साठवण योजनेला मिळणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:15+5:302021-05-28T04:08:15+5:30
नारायणगाव/ खोडद : जुन्नर तालुक्यातील मुथाळणे, कोपरे, मांडवे, जांभुळशी आदी दुर्गम भागातील गावांमधील पाणी टंचाई दूर करण्याचा दृष्टीने ...
नारायणगाव/ खोडद : जुन्नर तालुक्यातील मुथाळणे, कोपरे, मांडवे, जांभुळशी आदी दुर्गम भागातील गावांमधील पाणी टंचाई दूर करण्याचा दृष्टीने नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. सांसद आदर्शग्राम योजनेत दत्तक घेतलेले कोपरे येथील स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेला गती मिळणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
कोपरे गावात स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना तातडीने राबविण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेकडे केली होती.
या मागणीची तातडीने दखल घेत पुणे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व ग्रामस्थांच्या पथकाने कोपरे, जांभुळशी, मांडवे, मुथाळणे आदी गावांची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता भुजबळ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी उपअभियंता कैलास टोपे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, सरपंच ठमाजी कवठे, खासदारांचे प्रतिनिधी विजय कोल्हे व स्वीय सहायक तुषार डोके आदी उपस्थित होते.
पथकाने कोपरे, मांडवे, मुथाळणे व जांभुळशी येथील वाड्या-वस्त्यांना भेट देऊन येथील पाण्याच्या स्रोतांची तसेच आदिवासी दुर्गम भागातील सध्या अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या स्रोतांची देखील पाहणी केली. वाड्या-वस्त्यांमधील शिवकालीन तळे, एकदिवसीय पाणी साठवण तलाव, जर्मन फॅब्रिकेटेड तलाव यांची सद्यस्थितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यात काही शिवकालीन तळ्यांच्या गळतीमुळे कार्यान्वित नसल्याचे आढळून आले. त्यात नवीन तंत्रज्ञान वापरून यामध्ये पुन्हा पाणीसाठा कसा होईल, याबाबतचे नियोजनाचा समावेश आराखड्यात केला. यासोबतच शिवकालीन तळ्याला फिल्टर जोडून तेच पाणी पिण्यासाठी उपयोगात कसे आणता येईल हे देखील पडताळून पाहिले.
यावेळी मुख्य अभियंता भुजबळ यांनी तातडीने स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेंतर्गत जागा निश्चिती करून पाणी साठवण टाकी प्रस्तावित करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या. या खोऱ्यातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मांडवी नदी खोऱ्यात 'एमआय टँक' बांधण्यासंदर्भात लवकरच जलसंपदा व जलसंधारण विभागांसमवेत संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.
विविध योजना राबवून जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमधील पिण्याचे पाणी व जनावरांच्या पिण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. पुढील काळात दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार
२७ नारायणगाव
कोपरे, मांडवे, मुथाळणे व जांभुळशी येथील वाड्यावस्त्यांना भेट देऊन येथील पाण्याच्या स्रोतांची पाहणी करताना अधिकारी.
===Photopath===
270521\27pun_6_27052021_6.jpg
===Caption===
२७ नारायणगाव कोपरे, मांडवे, मुथाळणे व जांभुळशी येथील वाड्या-वस्त्यांना भेट देऊन येथील पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी करताना अधिकारी.