बेवारसांचे पालकत्व स्वीकारावे - डॉ. गिरीश कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:27 AM2019-03-20T02:27:58+5:302019-03-20T02:28:03+5:30
‘प्रत्येक पुुरुषामध्ये मातृत्वाची भावना लपलेली असते. परंतु, आपण कौटुंबिक चक्रव्युहात अडकल्याने परिवारापलीकडे पाहणे टाळतो. आजही राज्यात सुमारे दोन कोटी बालके अनाथ, बेवारस म्हणून फिरत आहेत.
पुणे - ‘प्रत्येक पुुरुषामध्ये मातृत्वाची भावना लपलेली असते. परंतु, आपण कौटुंबिक चक्रव्युहात अडकल्याने परिवारापलीकडे पाहणे टाळतो. आजही राज्यात सुमारे दोन कोटी बालके अनाथ, बेवारस म्हणून फिरत आहेत. त्यांचे पालकत्व स्वीकारणे गरजेचे आहे.
स्नेहालयसारख्या अनेक संस्था या क्षेत्रात काम करत असून अजूनही अनेक बालकांपर्यंत पोहोचता आलेले नाही,’ अशी खंत
अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तबगार मातेस दरवर्षी दिला जाणारा आदर्श आई पुरस्कार स्नेहालय परिवार या संस्थेला प्रदान करण्यात आला. उल्हास पवार यांच्या हस्ते स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी आणि वैजनाथ लोहार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर आणि श्यामची आई फाउंडेशनचे
अध्यक्ष भारत देसडला उपस्थित होते.
उल्हास पवार यांनी अध्यक्षीय मनोगतात स्नेहलयाच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. श्यामची आई फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला यांनी प्रास्ताविक केले. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. भारत देसडला यांनी आभार मानले.
मायेला मुकलेली मुले...
कुलकर्णी म्हणाले, ‘रेड लाईट एरियातील मुलं मायेची भुकेली असतात. त्यांच्यातील असुरक्षिततेला सामावून घेणारी कुशी त्यांना हवी असते. अट्टल गुन्हेगारीकडे वळलेलेल्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर ते मायेला मुकलेले असतात, असे आढळून येते. स्नेहालयात येणारी चिमुरडी वात्सल्याची भुकेली होती. त्यांच्या भुकेच्या हाकेला दिलेल्या हुंकारातून स्नेहालयचे कार्य सुरू झाले. माझ्यामुळे त्या मुलांना मातृत्व मिळाले असे नव्हे; तर त्यांच्यामुळे माझ्यातील मातृत्व ही भावना व्यापक झाली.’