मेट्रोला स्वारगेटजवळील ७ एकर जागेला मंजुरी, स्थायीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 03:08 AM2018-01-05T03:08:37+5:302018-01-05T03:09:08+5:30
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाच्या स्वारगेट येथील बहुउपयोगी स्थानकासाठी पुणे महापालिकेची स्वारगेट येथील ७ एकर जागा महामेट्रो कंपनीला देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या जागेचे मूल्य ६० कोटी रुपये निश्चित करण्यात आले...
पुणे - पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाच्या स्वारगेट येथील बहुउपयोगी स्थानकासाठी पुणे महापालिकेची स्वारगेट येथील ७ एकर जागा महामेट्रो कंपनीला देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या जागेचे मूल्य ६० कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून, ही रक्कम महापालिकेच्या वाट्याला महामेट्रोत जमा करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेतून वगळली जाणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. नाममात्र भाडेतत्त्वावर ही जागा देण्यात येणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची ही जागा आहे. एकूण क्षेत्र १४ एकर आहे. जागा देण्यास पाणीपुरवठा विभागाचा नकार होता; मात्र आयुक्तांनी यात मध्यस्थी केल्यामुळे जागा देण्याचा निर्णय झाला. महामेट्रोला या ठिकाणी मेट्रोचे बहुमजली, बहुउपयोगी स्थानक बांधायचे आहे. त्यांना या जागेशिवाय दुसरा पर्यायच आसपास नव्हता, असे मोहोळ म्हणाले.
जागा देण्यासंबधीचा व्यवहार प्रशासनाच्या वतीने लवकरच होणार आहे. मेट्रो स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गालाही मंजुरी मिळाली आहे. या मार्गाचे काम गतिमान झाले आहे. त्यामुळे जागा हस्तांतराचे कामही त्वरित केले जाईल. त्यासाठी करार वगैरे बाबी प्रशासन लवकर पूर्ण करेल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
महामेट्रोच्या एकूण खर्चात महापालिकेचा वाटा साधारण ९० कोटी रुपयांचा आहे. या जागेचे मूल्य सरकारी पद्धतीनुसार निश्चित करण्यात आले. एकूण १४ एकर जागेपैकी ७ एकर जागा त्यांच्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे तेवढीच जागा देण्याचा निर्णय झाला. तिचे मूल्य ६० कोटी रुपये इतके होते. महापालिका देय असलेल्या ९० कोटी रुपयांमधून ही किंमत वजा करण्याचे ठरले आहे. त्यामुळे महापालिकेवरचा तेवढा बोजा कमी होणार आहे, असे मोहोळ म्हणाले.