काँगे्रसचे अजित दरेकर यांना स्वीकृतची लॉटरी
By admin | Published: April 20, 2017 07:04 AM2017-04-20T07:04:59+5:302017-04-20T07:04:59+5:30
महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत काँगे्रस आणि शिवसेनेचे संख्याबळ समान असल्याने या दोघांपैकी एका नावाची बुधवारी सकाळी
पुणे : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत काँगे्रस आणि शिवसेनेचे संख्याबळ समान असल्याने या दोघांपैकी एका नावाची बुधवारी सकाळी प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये काँगे्रसचे अजित दरेकर यांना लॉटरी लागली. तर राष्ट्रवादी काँगे्रसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा अर्ज सुनावणीमध्ये बाद करण्यात आल्याने स्वीकृतसाठी सुभाष जगताप यांची निवड झाली.
महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या पाच जागांसाठी मंगळवार (दि.१८) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ९८ सदस्य असलेल्या संख्याबळानुसार भाजपाच्या वाट्याला तीन जागा आल्या. तर राष्ट्रवादी काँगे्रससाठी एक आणि शिवसेना व काँगे्रस सदस्यांची संख्या समसमान असल्याने दोघांपैकी एक जागा मिळणार होती. यासाठी मंगळवारी काँगे्रसच्या वतीने अजित दरेकर यांनी तर शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक योगेश मोकाटे यांनी अर्ज दाखल केला होता. या दोघांपैकी कोण, यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता राजेंद्र जगताप यांच्या कार्यालयात चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. दोघांच्या नावांच्या चिठ्ठ्या बंद डब्यात टाकून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये काँग्रेसचे अजित दरेकर यांना कौल मिळाला. याप्रसंगी प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप, नगरसचिव सुनील पारखी, सहआयुक्त विलास कानडे, विधी सल्लागार अॅड. रवींद्र थोरात, उपायुक्त सुहास मापारी, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, माजी नगरसेवक प्रशांत बधे हे उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने एका जागेसाठी सुभाष जगताप आणि रूपाली चाकणकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये चाकणकर यांनाच अंतिम संधी मिळणार होती. पक्षाच्या वतीने चाकणकर यांना तीन दिवस आगोदरच सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या सूचनादेखील दिल्या होत्या, परंतु भाजपा कार्यकर्त्यांच्या राडाबाजीमध्ये चाकणकर यांना अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यास उशीर झाला.
या तांत्रिक कारणामुळे चाकणकर यांचा अर्ज बाद करण्यात आला. यामुळे अपेक्षित नसताना देखील जगताप यांना स्वीकृत म्हणून संधी मिळाली. (प्रतिनिधी)