जन्म-मृत्यू दाखले मिळण्याचा मार्ग खुला; नोंद झाल्यावर दोन दिवसात दाखले
By निलेश राऊत | Published: April 10, 2023 02:05 PM2023-04-10T14:05:46+5:302023-04-10T14:05:57+5:30
जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीआरएस प्रणालीत तांत्रिक अडचणी आल्याने, १ एप्रिल पासून ती व्यवस्थित कार्यरत नव्हती
पुणे : केंद्र शासनाकडून जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी करण्यासाठी वापरण्यात येणारी सीआरएस प्रणाली ( नागरी नोंदणी पध्दती) राज्य शासनाकडून सोमवारी (दि.१०) सकाळपासून पुन्हा कार्यरत करण्यात आली आहे. यामुळे गेल्या पाच सहा दिवसांपासून जन्म मृत्यू नोंदणीचे ठप्प झालेले काम पुन्हा पुर्वरत झाले आहे.
जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीआरएस प्रणालीत तांत्रिक अडचणी आल्याने, १ एप्रिल पासून ती व्यवस्थित कार्यरत नव्हती. परिणामी ५ एप्रिल रोजी ही यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी काम हाती घेण्यात आले होते. तेव्हा राज्य शासनाकडून ही यंत्रणा कार्यरत होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूच्या घटनांच्या नोंदणी थांबविण्याबाबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले होते. त्यामुळे पुणे महापालिकेने हे काम ५ एप्रिलपासून थांबविले होते. दरम्यान आज सकाळी शासनाकडून पुन्हा ही यंत्रणा कार्यन्वित झाल्याचे सांगण्यात आले. त्यामळे नागरिक आता जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरी सुविधा केंद्रात अर्ज करू शकणार आहेत.
नोंद झाल्यावर दोन दिवसात दाखले
जन्म-मृत्यूची घटना घडल्यावर संबंधित हॉस्पिटलकडून या घटनेची माहिती महापालिकेला २१ दिवसांच्या आत पाठविणे जरूरी आहे. त्यानंतर विलंब झाल्यास संबंधित हॉस्पिटलला दररोज प्रत्येक घटनेमागे पंधरा रूपये दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांना जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी घटना घडल्यावर साधारणत: दहा दिवसात नागरी सुविधा केंद्रात अर्ज भरून दिल्यास, त्यांना महापालिकेकडून अवघ्या दोन दिवसात सीआरएस प्रणालीत नोंद करून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती उपआरोग्य प्रमुख डॉ.कल्पना बळीवंत यांनी दिली.