वाण लुटण्यासाठी अॅक्सेसरीज
By Admin | Published: February 4, 2016 01:39 AM2016-02-04T01:39:15+5:302016-02-04T01:39:15+5:30
पूर्वीपासून मकरसंक्रातीचे निमित्त साधत हळदी-कुंकू हा महिलांच्या आवडीचा कार्यक्रम अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते राबवीत असतात
रहाटणी : पूर्वीपासून मकरसंक्रातीचे निमित्त साधत हळदी-कुंकू हा महिलांच्या आवडीचा कार्यक्रम अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते राबवीत असतात. त्या वेळी सुवासिनीला वाण म्हणून प्लॅस्टिकचे डबे, गाळणी, चमचे, कंगव्याचा सेट यासह संसारोपयोगी वस्तू दिल्या जात होत्या. मात्र सध्या त्याची जागा हेडफोन, मोबाइल कव्हर, मोबाइल स्टॅँड, मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह, पॉवरबॅँक, सीडी, डीव्हीडी अशा हायटेक अॅक्सेसरीजने घेतली आहे. आधुनिक जगतातील आधुनिक
नारी आता संक्रांतीचे वाण लुटताना हायटेक झाल्याचे दिसून येते.
अॅक्सेसरीजबरोबरच मॉड्यूलर किचनला शोभतील आणि गृहिणींचे काम सोपे करतील, अशा वस्तूंचाही यंदा वाणात समावेश आहे. त्यात फ्रीजसेफ कंटेनर्स, मायक्रोवेव्ह सेफ, प्लॅस्टिकचे बाऊल, मायक्रोवेव्ह सेफ मग, पेंटजार्स, स्लायसर, रोटी प्लेट, फ्रूट कटर, लसूण सोलणी आदींचा समावेश आहे. बऱ्याच महिला मैत्रिणींची गरज ओळखून व वाण डबल होणार नाही याची काळजी घेत नवनवीन प्रकार शोधत आहेत. वाणातले हायटेक आयटम घाऊक प्रमाणात खरेदी करण्यासाठी होलसेल मार्केटची मदत घेतली जात असून, काही महिलांनी, तर आॅनलाइन आॅर्डर देऊन वस्तू मागविण्यावरही भर दिलेला दिसून येत आहे. यंदा महिलांचा वैविध्यपूर्ण वस्तूंची भेट देण्यावर भर आहे.
हटके पर्यायांना मागणी
संक्रांतीचे वाण लुटताना यंदा महिला वैविध्यपूर्ण, टिकाऊ व किफायतशीर दरातल्या वस्तूंची मागणी करीत आहेत. नवीन प्रकारांना त्या प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मुखशुद्धीचे बॉक्स, टिफिन बॉक्स यांना मागणी आहे. वाणाच्या वस्तूंबरोबरच हळदी-कुंकवाच्या डब्याही आवर्जून घेतल्या जात आहे. हळदी-कुंकू, हलवा पॅकबंद असणाऱ्या डब्यांना मागणी आहे.
- एक विक्रेता