Accident: दौंडमध्ये बहिणीला परीक्षेसाठी सोडायला जाताना घडला अपघात; भाऊ - बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:15 PM2022-03-31T20:15:07+5:302022-03-31T20:15:18+5:30
सख्ख्या बहीण-भावाच्या मृत्यूमुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली
दौंड : दौंड येथील शाळेत बहिणीला परीक्षेला सोडण्यासाठी जाताना दुचाकीला पिकअपची धडक बसली. या अपघातात बहीण-भावाच्या मृत्यू झाला. सख्ख्या बहीण-भावाच्या मृत्यूमुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी (दि. ३१) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दौंड काष्टी मार्गावरील धनश्री लॉन्स समोर हा अपघात झाला.
अनुष्का गणेश शिंदे (वय १४), आदित्य गणेश शिंदे (१२, दोघेही रा. निमगाव खलू, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे मृत पावलेल्या बहीण-भावाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, अनुष्का व आदित्य निमगाव खलू येथून दौंडकडे स्कूटीवरून निघाले होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप ( टेम्पो)ने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या आहे. पिकअप गाडी काष्टीच्या दिशेने जात असताना समोरील वाहनाला पिकअप गाडी ओव्हरटेक करीत होती. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला पिकअपने जोराची धडक देऊन अपघात केला. अपघाताची तीव्रता भयानक असल्याने अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर परिसरातील नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले, तर दुसरीकडे पिकअप गाडीचा चालक गाडी सोडून पळून गेला. विशेष म्हणजे पिकअप गाडीला नंबर नव्हता. अपघात जोरात असल्याने दोघेही बहीण-भाऊ जागीच ठार झाले. यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत करीत आहेत.
भाऊ आठवीत, तर बहीण नववीत
अनुष्का शिंदे ही दौंडमधील एका खासगी शाळेत शिक्षण घेत होती. आज तिची परीक्षा होती. त्यासाठी हे दोघे भावंडे आपल्या स्कूटीवरून निमगाव खलू येथून दौंडला येत होते. अनुष्का इयत्ता नववीमध्ये, तर तिचा भाऊ आदित्य हा इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.