पुन्हा अपघात! ब्रेक फेल झाल्याने मालट्रकची चार वाहनांना धडक; नवले पुलाजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 11:29 AM2020-11-05T11:29:21+5:302020-11-05T11:30:12+5:30
तांदळाची पोती घेऊन कर्नाटककडून मुंबईकडे निघालेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले.
पुणे (धायरी): मुंबई - बंगळुरू महामार्गावर एका माल ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चार वाहनांना तसेच एका दुचाकीस्वाराला धडक दिली आहे. यामध्ये दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने ह्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान तांदळाची पोती घेऊन कर्नाटक कडून मुंबई कडे निघालेला माल ट्रक ( क्रमांक KA १७ D ०३२१) वडगांव बुद्रुक येथील हॉटेल विश्वास समोर आला असता ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या चार वाहनांना धडक दिली. दरम्यान ट्रक खाली एक दुचाकी अडकल्याने ट्रक जागेवर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. ह्यामध्ये दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महामार्गावर अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, पोलीस उपनिरीक्षक धुळाजी कोळपे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली.
राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली.
राष्ट्रीय महामार्गामुळे मरण झाले स्वस्त
मुंबई - बंगळुरू महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ऑक्टोबर महिन्या मध्ये अशाच प्रकारे अपघात होऊन आठ वाहनांना धडक बसून एकाचा मृत्यू झाला तर मागील दोन दिवसांपूर्वीही ह्याच ठिकाणी एका ट्रकची पाच वाहनांना धडक झाली आहे.
तीव्र उतार असल्याने घडतात अपघात
नवीन कात्रज बोगदा ते वडगांव पुल दरम्यान तीव्र उतार असल्याने माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे ब्रेक लागणे अशक्य होते. अशावेळी वाहनांची गती कमी करण्यासाठी महामार्गावर पांढरे पट्टे करणे गरजेचे आहे.