Pune: चांदणी चौकात अपघात, चार जण जखमी; पायी जाणाऱ्या महिलेची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 01:22 PM2024-06-14T13:22:09+5:302024-06-14T13:23:29+5:30
अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे झाला का, यामागील नेमके कारण आरटीओच्या अहवालानंतर समोर येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले...
पुणे : शहरातील मार्केट यार्ड परिसरात डंपर चालकाने महिलेला चिरडल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. १३) चांदणी चौकात सिमेंट मिक्सर ट्रक आणि एसटी महामंडळाच्या मालवाहतूक करणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. दोन्ही वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने, वाहने दुभाजक तोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. यात कार्गो बसच्या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये महिलेची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडला. अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे झाला का, यामागील नेमके कारण आरटीओच्या अहवालानंतर समोर येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटीच्या कार्गो आणि सिमेंट मिक्सर ट्रकच्या अपघातात प्रफुल्ल नागपुरे, प्रसाद साळुंखे यांच्यासह एक जण किरकोळ जखमी, तर पायी जाणाऱ्या कविता साठे या गंभीर जखमी झाल्या आहेत. अधिक माहितीनुसार, एसटी महामंडळाची कार्गो बस हिंजवडीहून कोथरूडच्या दिशेने येत होती, त्याच वेळी चांदणी चौकातून खाली उतरत असताना बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस मिक्सर ट्रकला धडकली. त्यामुळे दोन्ही वाहने दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर गेली.
एसटीने मिक्सर वाहनाला धडक दिल्यामुळे दुसरीकडे वळण घेतले आणि समोरून जाणाऱ्या दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकी एसटीच्या चाकाखाली आली, तर दुसरी दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कविता साठे या पायी जात होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. इतर दोघांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त महिला भूगावमधून निघाली होती. तर, दुसऱ्या दुचाकीवरील तरुण मूळचा गोंदियातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने उतारावरून गाडी दुसऱ्याच लेनवर गेली आणि हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कोथरूड वाहतूक पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काही वेळातच परिसरातील वाहतूक सुरळीत केली.
एसटीत बालभारतीतील पुस्तके
मालवाहतूक करणारी एसटी पुस्तके घेऊन पनवेलमधून बालभारतीकडे निघाली होती. या वेळी एसटीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातस्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यासोबतच परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य दिले. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. एसटी कार्गो चालकाने मिक्सर वाहनचालकाला धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे.
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३