पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; पोलीस करणार सरकत्या जिन्यांचा तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 08:59 AM2024-07-02T08:59:13+5:302024-07-02T09:02:06+5:30
पुण्याच्या मेट्रो स्थानकात एका प्रवाशाचा सरकत्या जिन्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना जिल्हा न्यायालय स्थानकात घडली.
Pune Metro : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो स्थानकात अपघात झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सरकत्या जिन्यावरुन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा न्यायालय या मेट्रो स्थानकावर हा अपघात घडला असून त्यात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास आता पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून करणार आहेत.
सोमवारी संध्याकाळी पुण्याच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात हा सगळा प्रकार घडला. अचानक सरकत्या जिन्यावरुन पडल्याने या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. जिन्यावरुन पडल्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. मनोज कुमार (वय ४०) असे या या प्रवाशाचे नाव आहे.
मनोज कुमार हे संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरून जात होते. त्यावेळी ते अचानक जिन्यावरुन खाली पडले. त्यावेळी तिथल्या सुरक्षारक्षकांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांनी मनोज कुमार यांनी मेट्रो स्थानकातील वैद्यकीय कक्षात आणले. तिथल्या डॉक्टरांनी मनोज कुमार यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच कुमार यांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मनोज कुमार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. मात्र मनोज कुमार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. डॉक्टरांच्या शवविच्छेदनातून कुमार यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. दरम्यान, मनोज कुमार हे सरकत्या जिन्यावर कसे पडले, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहेत.