चुकीच्या बाजूने केलेल्या ' ओव्हर टेकिंग' मुळे झाला घात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:33 AM2019-09-17T11:33:59+5:302019-09-17T11:35:54+5:30

वाहने एकमेकांना ओव्हरटेक करीत असतानाचा त्यांनी उजव्या बाजूचाच वापर करणे अपेक्षित आहे...

accident caused by over-taking on the wrong side | चुकीच्या बाजूने केलेल्या ' ओव्हर टेकिंग' मुळे झाला घात

चुकीच्या बाजूने केलेल्या ' ओव्हर टेकिंग' मुळे झाला घात

Next
ठळक मुद्देओव्हरटेक करताना सिग्नल देणे आवश्यक महामार्गावर 60 ते 70 टक्के ओव्हरटेकींग केले जाते डाव्या बाजूने

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात संचेती रुग्णालयाचे मणका विकार तज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचा मृत्यू झाला असून या अपघाताला व्होल्वो बसने चुकीच्या पद्धतीने केलेले  ह्यओव्हरटेकींगह्ण कारणीभूत ठरल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच डॉ. खुर्जेकर यांच्या चालकानेही पंक्चर काढण्यासाठी चुकीच्या ठिकाणी उभी केल्याचेही पोलिसांनी सांगितले.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचेती रुग्णालयाचे मणका विकार तज्ज्ञ डॉ. खुर्जेकर हे डॉ. जयेश बाळासाहेब पवार आणि डॉ. प्रमोद भिलारे यांच्यासह मुंबईला मेडिकल कॉन्फरन्ससाठी गेलेले होते. कॉन्फरन्स आटोपल्यावर पुण्याकडे परत येत असताना त्यांच्या मोटारीचे टायर पंक्चर झाले. पंक्चर काढण्यासाठी चालक ज्ञानेश्वर विलास भोसले यांनी मोटार रस्त्याच्या कडेला लावली. परंतू ही गाडी ज्याठिकाणी उभी होती ती जागा वाहतुकीच्यादृष्टीने थांबण्यासाठी सुरक्षित नव्हती. चालक भोसले मोटारीचे चाक बदलत असताना डॉ. खुर्जेकर त्यांच्या शेजारी उभे होते. तर एक डॉक्टर चालकाच्या बाजूच्या सीटवर गाडीमध्येच बसून होते. दुसरे एक डॉक्टर बाहेरच्या बाजूस गाडीजवळ उभे होते. 
पाठीमागून भरधाव आलेल्या व्होल्वो बसने या मोटारीला धडक दिली. ही धडक वाहनाच्या उजव्या बाजूने बसली. व्होल्वो बस भरधाव येत असताना बससमोर एक वाहन आले. या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी चालकाने बस डाव्या बाजुला घेतली. वास्तविक उजव्या बाजूने वाहनाला ओव्हरटेक करणे आणि त्यासाठी आवश्यक सिग्नल देणे आवश्यक होते. बस डाव्या बाजुला आल्यानंतर त्याच लेनवर डॉ. खुर्जेकर यांची मोटार उभी होती. चालकाला बसचा वेग नियंत्रित न करता आल्याने बसची धडक या मोटारीला आणि मोटारीजवळ उभ्या असलेल्या डॉक्टरांसह चालक भोसले यांना बसली. या अपघातात डॉ. खुर्जेकर आणि चालक भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन डॉक्टर्सवर उपचार सुरु आहेत.
====
द्रुतगती मार्गावर लेन शिस्त पाळली जात नसल्याचे या घटनेवरुन पुन्हा एकदा समोर आले आहे. वाहने एकमेकांना ओव्हरटेक करीत असतानाचा त्यांनी उजव्या बाजूचाच वापर करणे अपेक्षित आहे. ओव्हरटेक करताना सिग्नल देणे आवश्यक आहे. परंतू, महामार्गावर 60 ते 70 टक्के ओव्हरटेकींग हे डाव्या बाजूने केले जाते. त्यामुळे वाहनचालकांनीही खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. 
====
... तर अपघात टळला असता
पंक्चर काढण्यासाठी ज्याठिकाणी मोटार उभी करण्यात आलेली होती, ती जागा सुरक्षित नव्हती. वास्तविक तेथे गाडी उभी केल्यावर मोटारीतील चालक व प्रवाशांनी मोटारीपासून दूर सुरक्षित ठिकाणी उभे राहणे आणि मोटारीपासून काही अंतरावर पाठीमागून येणाºया वाहनांना समजेल असा सिग्नल देणे आवश्यक होते. हा सिग्नल मिळाला असता तर आणि बस चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केले नसते तर कदाचित हा अपघात टाळता आला असता.
====
जर वाहने पंक्चर झाली अथवा वाहनामध्ये बिघाड झाल्यास वाहन रस्त्याच्या कडेला लावून तात्काळ 9822498224 या क्रमांकावर संपर्क साधावा. महामार्ग पोलिसांकडून तात्काळ मॅकेनिक, क्रेन आणि रुग्णालयाची सोय केली जाते. यासोबतच पोलिसांची आणि डेल्टा फोर्सची गस्तही सुरु असते. द्रुतगती मार्गावर वाहने थांबविण्यास मनाई आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वाहन थांबविण्याची वेळ आलीच तर वाहनापासून दूर सुरक्षितस्थळी थांबावे. महामार्ग पोलिसांशी संपर्क साधावा. 
- मिलींद मोहिते, अधीक्षक, महामार्ग पोलीस, पुणे

Web Title: accident caused by over-taking on the wrong side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.