अपघात दाव्यातून उघड झाली विमा कंपनीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 08:52 PM2018-01-07T20:52:42+5:302018-01-07T20:52:59+5:30
शिवाजीनगर न्यायालयातील मोटार अपघात दाव्यातील एका प्रकरणाची कागदपत्रे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे आली. त्यातील पॉलिसी पाहिल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या वतीने बनावट पॉलिसी काढून देऊन फसवूणक करण्यात आल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
पुणे : शिवाजीनगर न्यायालयातील मोटार अपघात दाव्यातील एका प्रकरणाची कागदपत्रे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे आली. त्यातील पॉलिसी पाहिल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या वतीने बनावट पॉलिसी काढून देऊन फसवूणक करण्यात आल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
या प्रकरणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक तुषार सावरकर (वय ३२, रा. कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे आरोरा टॉवरला कार्यालय आहे. हा प्रकार २०१२ मध्ये घडला होता. याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवाजीनगर येथील मोटार अपघात न्यायालयात एक दावा दाखल करण्यात आला आहे. त्यातील क्लेमबाबत दाखल करण्यात आलेल्या विमा पॉलिसीची कागदपत्रे कंपनीला मिळाली. कंपनीने त्याची पडताळणी केली तर ती पॉलिसी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. बाबासाहेब महादेव कुदळे यांना एकाने फोन करून पॉलिसी उतरून देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना बनावट पॉलिसी काढून दिली होती.
पैगंबर इस्माईल शेख हे आपल्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आले होते. त्यांनाही बनावट पॉलिसी दिल्याचे उघड झाले. त्यानंतर कंपनीच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक काटे अधिक तपास करीत आहेत.