चुकीच्या चेंबरमुळे अपघात
By admin | Published: March 30, 2017 12:10 AM2017-03-30T00:10:16+5:302017-03-30T00:10:16+5:30
अवसरी खुर्द (ता. अांबेगाव) येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार योजनेचे काम
अवसरी : अवसरी खुर्द (ता. अांबेगाव) येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार योजनेचे काम पूर्ण झाले. गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर, गावठाणात १७ ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्यासाठी चेंबर बांधले आहे. या चेंबरच्या वर झाकण न टाकल्याने या चेंबरमध्ये चारचाकी, दोनचाकी वाहने जाऊन अपघात झाले आहे. चुकीच्या ठिकाणी चेंबर उभारल्याने अपघातात वाढ होत आहे.
काही ग्रामस्थांनी चेंबरमध्ये पाणी सोडण्याऐवजी दगड-गोटे आणून टाकले आहे. शासन निधी भरपूर देणे व त्या निधीची उपयोग ग्रामपंचायतीने योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्य शासनाच्या आदर्श आमदार योजनेअंतर्गत अवसरी खुर्द हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामांसाठी मंजूर होत आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने बंदिस्त गटार योजनेचे काम केले. परिसरातील घरांचे सांडपाणी सोडण्यासाठी १७ चेंबर बनविण्यात आले. चेंबरचे काम पूर्ण झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीने हे चेंबर जागोजागी तोडून त्यातून नळपाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन टाकली आहे. चेंबर तोडल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या तोडलेले चेंबर लक्षात येत नाहीत. खालची वेस व रवींद्र कोष्टी यांच्या घरालगत धोकादायक चेंबर बांधल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने दोन्ही ठिकाणची जागा बदलून इतर ठिकाणचे चेंबर दुरुस्त करून चेंबरला लोखंडी झाकणे टाकावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे. (वार्ताहर)
बाराही महिने पाणी
गावठाणांतर्गत नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या लोखंडी पाइप लाइनसाठी दोन वर्षांपूर्वी १ कोटी रुपये मंजूर होऊन काम चालू झाले. ग्रामपंचायतीचे योग्य नियोजन नसल्याने तीन वेळा लोखंडी पाइपलाइन गाडली, उकरली. परंतु, अद्याप नवीन पाइपला पाणी सोडले नाही. गावठाणात बाराही महिने दिवसाआड पाणी सोडले जाते. परंतु, नळपट्टी वर्षाची घेतली जाते. याला काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. गावच्या नळपाणी योजनेच्या कामसाठी अद्यापपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीचा उपयोग योग्यरीतीने होतो किंवा नाही, याची चौकशी करून दोन वर्ष नळपाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने चालू आहे याची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहे.