मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात सिमेंटची गाडी उलटली; चालकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:40 AM2022-03-26T11:40:24+5:302022-03-26T11:42:05+5:30
सुरक्षा भिंतीवरून खाली कोसळल्याने अपघात
लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटात शुक्रवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास सिमेंटची पोती घेऊन जाणारी गाडी (MH 46 DM 7806) सुरक्षा भिंतीवरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
उत्तम कैलास दास (वय 34, रा. पश्चिम बंगाल) असे या मयत चालकाचे नाव आहे. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेटोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग पोलीस, लोकमान्यची टिम मृत्यूंजय, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत मयत चालकाला गाडीखालून बाहेर काढले. ढेकू गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
मागील काही दिवसात विशेषतः घाट परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. घाट भागात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. तसेच उतार परिसरात चालक वाहने न्युट्रल करून चालवत असल्याने अनेक वेळा ब्रेक न लागल्याने अपघात होत आहेत. मागील महिन्यात या परिसरात अनेक वाहनांचे एकत्र अपघात झाले आहेत.
घाट परिसरातील अपघात रोखण्यासाठी चालकांनी वाहने नियंत्रणात चालवावी, तसेच नियमांचे पालन करावे, लेन कटिंग करू नये, उतारावर वाहेन न्युट्रल करू नयेत असे आवाहन महामार्ग पोलीस केले आहे. आज सकाळी जो सिमेंटचा टेम्पो पलटी झाला, हा अपघात नेमका कसा झाला हे चालक मयत झाल्याने समजू शकले नसले तरी याप्रकरणी खोपोली पोलीस अधिकचा तपास करत आहेत.