महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहा लाखांचा अपघात विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:37+5:302021-03-25T04:11:37+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा समूह वैयक्तिक अपघात विमा योजना दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीकडून ...
पुणे : पुणे महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा समूह वैयक्तिक अपघात विमा योजना दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीकडून उतरविण्यात आला असून, यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यापुढेही दहा लाखांचे अपघात विमा कवच २१ मार्च, २०२२ पर्यंत लागू राहणार आहे़
सदर विमा योजनेचा लाभ महापालिकेच्या सर्व सेवकांना चोवीस तास जगभरात कुठेही वावरत असतानाही लागू राहणार आहे़ या योजनेमध्ये अपघातामुळे मृत्यू झाल्यास व कायमचे अपंगत्व आल्यास १०० टक्के परतावा म्हणजे दहा लाख रुपये मिळणार आहेत़ तर अपघातात दोन हात, दोन पाय किंवा दोन्ही डोळे गमावून अपंगत्व आल्यासही दहा लाख रुपये विमा रक्कम मिळणार आहे़ तसेच एक हात, पाय किंवा डोळा गमावून अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये मिळणार आहेत़
सदर अपघात विमा योजनेबाबतचा करारनामा २२ मार्च, २०२१ रोजी करण्यात आला असून, या विमा योजनेबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कळविण्याबाबत महापालिकेच्या सर्व विभागाप्रमुखांना मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांनी कळविले आहे़
-----------------------------
चौकट
समूह अपघात विमा योजना (ग्रुप एन्शोरन्स) करिता पुणे महापालिका दर वर्षी विमा कंपनीला २१ लाख रुपये हप्त्यापोटी देत असून, ही रक्कम सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वर्षातून एकदा घेतली जात आहे़ यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर याचा कोणताही बोजा पडत नाही़ सदर योजना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही म्हणजेच सुमारे साडेसोळा हजार कर्मचाऱ्यांना लागू आहे़ गतवर्षी म्हणजे सन २०२०-२१ मध्ये पाच जणांचे दावे कंपनीकडे पाठविण्यात आले होते व ते मंजूरही झाले आहेत़
---------------------