दहा तृतीयपंथीयांना पाच लाखांचा अपघाती विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:44+5:302021-03-07T04:11:44+5:30
पुणे : टीम ट्रान्स थॉटच्या वतीने राज्यात सामाजिक, राजकीय तसेच वैयक्तिक पातळीवर काम करणाऱ्या दहा तृतीयपंथीसाठी ५ लाखांचा अपघाती ...
पुणे : टीम ट्रान्स थॉटच्या वतीने राज्यात सामाजिक, राजकीय तसेच वैयक्तिक पातळीवर काम करणाऱ्या दहा तृतीयपंथीसाठी ५ लाखांचा अपघाती विमा काढण्यात येणार आहे. यासाठी दहा तृतीयपंथियांची प्रातिनिधिक स्वरूपात निवड करण्यात आली आहे. उद्या (दि.८) महिला दिनी त्यांना हा विमा देण्यात येईल.
तृतीयपंथी समूह नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. याची जाणीव फार कमी लोकांमध्ये दिसते. त्यांनाही सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. या जाणिवेतून सामाजिक काम करतेवेळी चुकून अपघात झाल्यास त्यांच्या कुठल्याही कार्यात अडथळा येऊ नये. या उद्देशाने हा उपक्रम देशात प्रथमच राबवविण्यात येत आहे. याकरिता टीम ट्रान्स थॉटचे राहुल सिद्धार्थ साळवे, दीपक सोनावणे आणि राजेश मोरे या त्रयीने पुढाकार घेतला आहे.
......
तृतीयपंथी हे देखील समाजाचा एक घटक आहेत. ते पुढे येऊन काहीतरी करू पाहत आहेत. समाजव्यवस्थेच्या बदलाच्या प्रक्रियेत ते भाग घेत आहेत. आज आम्ही एवढे करू शकतो तर इतर लोकही त्यांच्यासाठी पुढाकार घेऊन करू शकतात ही त्यामागची भावना आहे. हा उपक्रम लोकसहभागातून राबविला जात आहे.
- दीपक सोनावणे, टीम ट्रान्स थॉट
...
यांचे काढले अपघात विमा
महाराष्ट्रातील सलमा खान, दिशा पिंकी शेख, चांदणी शेख, प्रिया पाटील, शमिभा पाटील, विकी शिंदे, गौरी शिंदे, अनिता वाडेकर, पाकीजा जान किन्नर, चंदना खान यांचे प्रातिनिधिक स्वरूपात अपघात विमा काढले आहेत.