पालिका कर्मचाऱ्यांसाठी अपघात विमा योजना
By admin | Published: July 25, 2016 02:29 AM2016-07-25T02:29:45+5:302016-07-25T02:29:45+5:30
महापालिकेने प्रथम वर्ग ते चतुर्थ श्रेणी वर्गातील एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे
पुणे : महापालिकेने प्रथम वर्ग ते चतुर्थ श्रेणी वर्गातील एकूण १८ हजार कर्मचाऱ्यांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीवर असताना कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत मिळणार आहे. येत्या १५ आॅगस्टपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे.
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिलपासून समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर पालिकेच्याही कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपघातामध्ये अपंगत्व आल्यास, अपंगात्वाच्या टक्केवारीनुसार या योजनेअंतर्गत मदत दिली जाणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना १७२ रुपयांचा वार्षिक हप्ता भरावा लागणार आहे. दर वर्षी त्यांच्या वेतनातून हा हप्ता कापला जाणार आहे. जे कर्मचारी हप्ता भरतील, त्यांनाच या योजनेचा लाभ
मिळणार आहे. विम्याचे वर्ष जुलै ते आॅगस्ट असे असणार आहे. महापालिकेकडून या योजनेसाठी विमा कंपन्यांकडून दर मागविले होते. १५ आॅगस्ट रोजी रितसर या घोषणेचा शुभारंभ केला जाणार आहे.