क्रेनने चिरडल्याने युवती ठार,बंडगार्डनरोड येथील गंभीर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 23:16 IST2020-01-14T23:15:35+5:302020-01-14T23:16:15+5:30
या भीषण अपघातामुळे मेट्रो कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

क्रेनने चिरडल्याने युवती ठार,बंडगार्डनरोड येथील गंभीर अपघात
पुणे - मेट्रो कामाच्या क्रेनने चिरडल्याने दुचाकीवरील युवतीचा जागीच मृत्यू झाला .मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बंडगार्डन रोड येथे हा अपघात झाला. दिक्षा नरहरी ओगले (वय 17,रा.गोकुळ काँलनी दिघी) या युवतीचा क्रेनचे चाक डोक्यावरुन गेल्याने मृत्यू झाला. अपघात करणार्या क्रेन चालकाविरूध्द कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गंभीर बाब म्हणजे याच रस्त्यावर पंधरा दिवसात दोघांना अपघातात जीव गमवावा लागला आहे.
मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दिक्षा ही तिच्या (एमएच 14 एचपी 5677) वरून बंडगार्डन रोडने येरवड्याकडे जात असताना फाइव्ह स्टार सोसायटी समोर मेट्रोचे काम करणार्या क्रेन क्र.(एमएच 12आरके 6632) च्या पुढच्या डाव्या चाकाखाली दिक्षा कोसळली. डोक्यात हेल्मेट असताना क्रेनचे चाक डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात करुन क्रेनचालक फरार झाला. रस्त्याची उंची कमी अधिक असल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी क्रेनचालकाविरुध्द तिच्या मृत्यूस जबाबदार म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पंधरा दिवसांत झालेल्या दोन अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. या भीषण अपघातामुळे मेट्रो कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.