मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पो व दुचाकीची धडक, 1 विद्यार्थी ठार 2 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 08:25 AM2018-04-27T08:25:33+5:302018-04-27T08:25:33+5:30
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे टेम्पो व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.
लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे टेम्पो व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील दोन जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री सायंकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मयत व जखमी हे लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
शुभम वाल्मिक मोरे (वय 26, रा. जालना) असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव असून त्याच्या सोबत असलेले शुभम विलास जाधव (वय 20) व विक्की दयानंद वाघमारे (वय 22) हे जखमी झाले आहेत.
मयत शुभमचा मित्र शुभम सुनिल शेडगे याने लोणावळा शहर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड महविद्यालयाचे 20 ते 25 विद्यार्थी त्यांचे मित्र दर्शन सिरोया व ऋषीकेश देशमुख यांच्या वाढदिवसाचे जेवण करण्याकरिता दुचाकी गाड्यांवरुन खोपोलीला गेले होते. जेवण करुन पुन्हा लोणावळ्यात परतत असताना खंडाळ्यातील कोहिनूर पॅलेसच्या गेटसमोर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला पुण्याहून मुंबईच्या दिशेने वेगात निघालेल्या टेम्पोची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दुचाकीवरील जखमी झालेल्या तिघांनाही त्यांच्या मित्रांनी लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी शुभम मोरे याच्या डोक्याला गंभिर मार लागल्याने त्याचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस अधिकचा तपास करत आहेत.