नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 04:28 PM2019-08-10T16:28:33+5:302019-08-10T16:31:17+5:30
मुंबई - बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या सेफ्टी गार्डच्या लोखंडी पाईपवरच टेम्पो गेल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
पुणे : मुंबई - बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या सेफ्टी गार्डच्या लोखंडी पाईपवरच टेम्पो गेल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण जखमी आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळ घडली. चालक बालकिशन रामतरण काकाणी (वय :५० , राहणार कंटेवस्ती , शिवणे , तालुका हवेली, जिल्हा पुणे ) हे जखमी झाले असून, चालक बालकिशन यांच्याशेजारी बसलेला त्यांचा मुलगा प्रीतम बालकिशन काकाणी (वय :१७) ह्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
वेफर्स, कुरकुरे, फरसाण इत्यादी वस्तूचा माल घेऊन पुणेच्या दिशेने निघालेला टेम्पो (क्रमांक MH १२ PQ २८१४ ) दुपारी नवीन कात्रज बोगद्यातुन बाहेर पडण्याच्या आधीच थोडा उतार असल्याने तसेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सेफ्टी गार्डच्या लोखंडी पाईपमधून टेम्पोची अर्धी बाजू अक्षरशः २० मीटर आत गेल्याने चालकाशेजारी बसलेल्या तरुणाच्या पोटातून लोखंडी पाईप आरपार गेला. तर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता कि पाहणाऱ्याच्या काळजाचे पाणी झाले. काही नागरिकांनी चालकाला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते आहे. घटनेचे वृत्त समजताच भारती विद्यापिठ पोलीस ठाण्याचे मार्शल तुकाराम कदम , दत्तात्रय खपाले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी तसेच नांदेड सिटी अग्निशमन दलाचे कर्मचारी आदींनी त्वरित घटनास्थळी पोहचून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पोटात गेलेला रॉड कापून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बडे व सहायक पोलीस फौजदार पठाण तपास करीत आहेत.