राहू-वाघोली PMP बसचा अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात; नऊ ते दहा प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 11:26 AM2023-09-04T11:26:19+5:302023-09-04T11:27:33+5:30
बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत बस गेल्याने अपघात...
पाटेठाण (पुणे) : राहू-वाघोली रस्ते मार्गावर प्रवासी वर्गाला घेऊन जात असलेल्या पीएमपीएल बसचा अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत बस गेल्याने अपघात होऊन बसमधील ज्येष्ठ नागरिकांसह महाविद्यालयातील नऊ ते दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना सांगवी फाटा येथे सोमवार (दि. ४) रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडली आहे. अपघात घडल्यानंतर जखमी प्रवाशांना सामाजिक कार्यकर्ते सुभाष नवले, ॲड. प्रशांत जाधव व इतर युवक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.
राहू ते वाघोली रस्ते मार्गावर पीएमपीएलची मार्ग क्रमांक १३७ पुणे स्टेशन ते पारगाव या बसचा पारगावकडून पुणे स्टेशनला जात असताना हा अपघात घडला आहे. पीएमपीएलच्या वतीने प्रवासी वाहतुकीसाठी राहू ते वाघोली या मार्गावर काही भाडेतत्त्वावर घेतलेल्या बस पुरविल्या जातात. परंतु या बस अनेक वर्षांच्या झाल्या असल्यामुळे वारंवार या मार्गावर बसमध्ये बिघाड किंवा इतर अपघात घडून येण्याचे प्रमाण वाढले आहेत. नादुरुस्त बसच्या माध्यमातून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या जीवाशी खेळ होत असून यामध्ये चांगल्या दर्जाच्या बसेस पुरविण्याची मागणी प्रवासी वर्गातून पुढे येत आहे.