मुंबई-पुणे महामार्गावर पिकअप दिंडीत घुसल्याने भीषण अपघात; 4 महिलांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:50 PM2021-11-27T12:50:23+5:302021-11-27T13:51:22+5:30
अपघात इतका भीषण होता की, अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडा सांडला होता. महिलांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली...
वडगाव मावळ:आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट पायी दिंडी जात असताना शनिवारी (दि.२७) सकाळी ७ वा. साते फाटा मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात मालवाहतूक पिकअप जोरात दिंडीत घुसल्याने २४ जण जखमी तर चार महिलांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका व स्थानिक नागरिकांनी जखमींना औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही दिंडीतील भाविक व जखमींना मदत पाठविली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक विलास भोसले आदींनी घटनास्थळी व जखमींची विचारपूस केली. जयश्री आत्माराम पवार (वय ५४रा. कर्जत, भूतीवली) सविता वाळकू यरम (वय ५८रा. खालापूर, उंबरे ) आणि विमल चोरगे ( वय ५० रा. खालापूर), संगीता वसंत शिंदे (वय ५६ रा. कर्जत ता. खालापूर) या चार महिलांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
जखमींची नावे पुढील प्रमाणे: मंदा बाबू वाघमारे वय २५ रा. उंबरे, वनिता बबन वाघमारे वय ३५, रा. उंबरे, रंजना गणेश वाघमारे वय ३२ रा. पाली, राजेश्री राजेश सावंत वय ३५, रा. खोपोली, सुरेखा तुळशीराम करनुक वय ६०, रा. बीड खुर्द, वंदना राम करनुक वय ६० रा. बीड खुर्द, माणिक बळीराम करनुक वय ८०, रा. बीड खुर्द, दिव्या दीपक चांदुरकर वय ४२ रा. उरण, आशा अनंता साबळे वय ५० रा. वडप, शारदा चंद्रकांत अहिर वय ६० रा. उंबरे,
सुमित्राबाई बबन चोरघे वय ६५ रा. बीड खुर्द, पुष्पांजली दिलीप करनुक वय ६५ ,रा. खोपोली, सुभद्रा सीताराम शिंदे वय ७० रा. खोपोली, बेबी रामदास सावंत वय ४९ रा. कर्जत, सुनंदा सदाशिव चोरघे वय ५०, रा. बीड खुर्द, रंजना अशोक करनुक वय ५५ रा. बीड खुर्द, राधिका बाळकृष्ण भगत वय ४० रा. बीड खुर्द, पुष्पा गणपत पालकर वय ४० रा. बीड खुर्द, अनुसया बंडू जाधव वय ४५ रा. उंबरे, शोभा चंद्रकांत सावंत वय ५५ रा. साळवट, अनुसया मधुकर जाधव वय ५५, रा.बीड खुर्द, बेबी लक्ष्मण करनुक वय ५६ रा. बीड खुर्द, ताई बबन वाघमारे वय ५० रा. बीड खुर्द आदी जखमी असून तालुका खालापूर जि. रायगड येथील रहिवासी आहेत.
अपघातातील जखमींना कामशेत महावीर हॉस्पिटल, बढे हॉस्पिटल, कान्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात, सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल मध्ये औषधोपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट पायी दिंडी उंबरे ता. खालापूर ही मंगळवार दि.३० रोजी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त जात असताना, साते फाटा (ता. मावळ) मुंबई-पुणे महामार्गावर (एम एच १२ एस एक्स ८५६२) क्रमांक टेम्पो चालक राजीव प्रमोद चौधरी वय ३० रा. वाघोली पुणे) यांने भरधाव वेगाने टेम्पो पायी जाणाऱ्या दिंडीतील महिलांच्या अंगावर घालून त्यांना चिरडले.
अपघात इतका भीषण होता की, अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडा सांडला होता. महिलांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. घटनास्थळी आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके, सरपंच विजय सातकर, रुपेश गायकवाड, माजी सरपंच संतोष जांभुळकर, पोलीस पाटील शांताराम सातकर, गजानन शिंदे, संदीप कुंभार, पोलीस उप निरीक्षक संतोष चामे, विकास सस्ते, पोलीस कर्मचारी अमोल तावरे, संपत वायळ, आदित्य भोगाडे, गणपत होले, अजय शिंदे आदी उपस्थित होते. आरोपी टेम्पो चालक राजीव चौधरी याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक विकास सस्ते करत आहेत.