कोयत्याने वार; आरोपींना पोलीस कोठडी
By admin | Published: April 25, 2017 04:21 AM2017-04-25T04:21:14+5:302017-04-25T04:21:14+5:30
गप्पा मारत बसलेल्या दोन मित्रांवर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. पानसरे यांनी दिला.
पुणे : गप्पा मारत बसलेल्या दोन मित्रांवर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. पानसरे यांनी दिला.
सुधीर महादेव मसूरकर (वय २६, रा. आंबेगाव पठार, मूळ रा. कोळवडी, पो. जावळी, ता. भोर) आणि विशाल ऊर्फ छोट्या बाबूराव गायकवाड (वय २६, रा. अरण्येश्वर) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. गणेश सुभाष मसूरकर, राहुल नागरे या दोघांवर याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मुज्जमील ऊर्फ गोट्या अब्दुल नजीर मुल्ला (वय २९, रा. धनकवडी) याने याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना २२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास बालाजीनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्या वेळी गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यासाठी आणि दोन फरार साथीदारांच्या शोधासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील सुहास धुमाळ यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.(प्रतिनिधी)