‘शिवशाही’ला दररोज होतोय अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 10:40 AM2019-11-26T10:40:33+5:302019-11-26T10:41:23+5:30

‘शिवशाही’वर प्रश्नचिन्ह

Accident of 'Shivshahi' bus on a daily | ‘शिवशाही’ला दररोज होतोय अपघात

‘शिवशाही’ला दररोज होतोय अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देअपघातांचे सत्र थांबेना

पुणे : प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बस अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. सोमवारी (दि. २५) कात्रज घाटाजवळ झालेल्या अपघातानंतर मागील सव्वा दोन वर्षांतील राज्यातील अपघातांचा आकडा ५५० वर गेला आहे. याचा अर्थ बसचे दररोज एक ते दोन अपघात होत असल्याने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेशी तर तडजोड केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
खासगी लक्झरी बससेवेला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने दि. १ जून २०१७ रोजी वातानुकूलित बससेवा सुरू केली. तिकीटदरही माफक असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या स्वत:च्या मालकीसह भाडेतत्त्वावरील १ हजार बसचा समावेश आहे. पण ही सेवा सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र कमी होताना दिसत नाही. सोमवारी (दि. २५) कात्रज घाटाजवळ शिंदेवाडी येथे शिवशाही बस दरीत कोसळून दोन प्रवाशांच्या मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक-औरंगाबाद मार्गावर झालेल्या अपघातात काही प्रवासी जखमी झाले होते. हे अपघातांचे सत्र सुरूच राहिल्याने शिवशाहीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार १ जून २०१७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत शिवशाहीचे राज्यभरात ५५० लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या ५१ वर पोहचली असून, ३७१ गंभीर तर ११५ किरकोळ स्वरूपाचे अपघात आहेत. एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान एकूण ४४२ अपघात झाले असून ४४ प्राणांतिक व ३०० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. अपघातांच्या एकूण संख्येचा विचार केल्यास ही सेवा सुरू झाल्यापासून दररोज सरासरी एक ते दोन अपघात झाले आहेत. शिवशाहीच्या अपघातांचा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. त्यानंतर एसटी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून केला होता. पण हा दावा फोल ठरला आहे.
..........
मागील काही दिवसांतील अपघात
४२५ नोव्हेंबर-शिंदेवाडी-२ मृत्यू, २५ जखमी
४१७ नोव्हेंबर-नाशिक-औरंगाबाद महामार्ग-काही प्रवासी जखमी
४७ नोव्हेंबर-पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ -  ५ ते ७ प्रवासी गंभीर जखमी
४३१ ऑक्टोबर-नाशिक-पुणे महामार्गावर-महिलेचा मृत्यू
४३० ऑगस्ट-पुणे-सोलापूर महामार्गावर शेटफळजवळ-
१ मृत्यू, १४ जखमी
........
अपघात टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न 
एसटीतील वरिष्ठ अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार, शिवशाही ताफ्यात येण्यापूर्वीचे बसचे अपघात व शिवशाहीचे अपघात यामध्ये मोठी तफावत आहे. शिवशाहीच्या अपघातांमुळे तिच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित राहिले आहेत. पण या बस आरामदायी असल्याने प्रवाशांची पसंती मिळत आहे. अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: Accident of 'Shivshahi' bus on a daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.