दुचाकीस्वारीला भरधाव कारने उडवले; अपघाताला तीन दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:39 AM2020-09-27T00:39:52+5:302020-09-27T00:40:58+5:30
टिंगरेनगर येथील लेन नंबर 13 येथे बुधवारी रात्री हा गंभीर अपघात झाला.
पुणे (विमाननगर) : तीन दिवसापूर्वी दुचाकीवरून घरी निघालेल्या केमिस्ट चालकाला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक देऊन कार चालक पसार झाला. अनिल विठ्ठलराव शहाकर (वय ५४, रा. संजयपार्क, पुणे) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. टिंगरेनगर येथील लेन नंबर 13 येथे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा गंभीर अपघात झाला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावर घटनेचे गांभीर्य लक्षात येते. अपघातातील जखमी अनिल शहाकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडून तीन दिवस उलटून देखील या प्रकरणी अद्याप विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
अनिल शहाकर यांचे टिंगरे नगर रोड नंबर 7 येथे अनुज मेडिकल हे दुकान आहे. बुधवार (दि. 23) रोजी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून संजय पार्क येथे घरी जात असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लेन नंबर 13 कडून भरधाव वेगाने येणार्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात करून कार चालक फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता त्यांना मोठ्या दवाखान्यात नेण्यास सांगण्यात आले. बुधराणी रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर इतर दोन-तीन मोठ्या रुग्णालयात जाऊन देखील जागा नसल्यामुळे अखेरीस नगर रोड येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले. याठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी विश्रांतवाडी पोलिसांनी माहिती घेतली. रुग्ण बोलण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे तसा जबाब स्टेशन डायरीला नोंदवला. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता अपघात करणाऱ्या कारचा नंबर अद्याप पोलिसांना मिळाला नसल्यामुळे अपघात होऊन तीन दिवस उलटून देखील गुन्हा दाखल झालेला नाही.