देवदर्शन करून मुंबईला जाताना अपघात; एकाच कुटुंबातील दाम्पत्याचा मृत्यू, आठ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 16:29 IST2023-02-26T16:29:43+5:302023-02-26T16:29:51+5:30
पिकअप जीपमधून पांडे कुटुंबीय शनिशिंगणापूर येथून देवदर्शन करून मुंबईकडे जात होते

देवदर्शन करून मुंबईला जाताना अपघात; एकाच कुटुंबातील दाम्पत्याचा मृत्यू, आठ जण जखमी
आळेफाटा : पिकअप जीप व मालवाहू टेम्पो यांच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना नगर कल्याण महामार्गावर बेल्हा परिसरात रविवार (दि.२६) रोजी सकाळी पावणेसात वाजता घडली.
या अपघातात रिपुसूदन सर्वग्यनाथ पांडे (वय ५४) व त्यांच्या पत्नी चंद्रकला रिपुसूदन पांडे (वय ४६ रा. तळोली, घनसोली नवी मुंबई) अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगर कल्याण महामार्गाने मुंबई बाजूला जाणारी पिकअप जीप व आळेफाटा बाजूने नगर बाजूला जाणारा मालवाहू टेम्पो यांच्यामध्ये बेल्हा परिसरात सविता पेट्रोल पंपाजवळ रविवारी सकाळीच जोराची टक्कर झाली. या अपघातात पिकअप टेंम्पोमधील रिपुसूदन पांडे व चंद्रकला पांडे हे पती-पत्नी गंभीर जखमी होऊन ठार झाले. तर पल्लवी रिपुसूदन पांडे (वय १७) मधुसूदन सर्वग्यनाथ पांडे (वय ६१) पौर्णिमा मुरलीधर पांडे (वय २०) अनिता मधुसूदन पांडे (वय ४२) अपर्णा मुरलीधर पांडे (वय ५) मुरलीधर मधुसूदन पांडे (वय ३५) चांदणी रिपुसूदन पांडे (वय २५) सर्व (रा तळोली घणसोली नवी मुंबई) हे व मालवाहतूक टेंम्पोमधील एकजण जखमी झाले.
पिकअप जीपमधून पांडे कुटुंबीय शनिशिंगणापूर येथून देवदर्शन करून मुंबईकडे जात होते. अपघातानंतर दोन्ही वाहनातील जखमींना ग्रामस्थांनी आळेफाटा येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार पोलिस हवालदार विकास गोसावी, महेश काठमोरे हे घटनास्थळी गेले व त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या पल्लवी पांडे व अनिता पांडे यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत चांदणी पांडे यांचे फिर्यादीवरून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार तपास करत आहे.