Pune Fashion Street Market Fire : दुर्दैवी! आग विझवण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न; घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 09:43 AM2021-03-27T09:43:48+5:302021-03-27T10:02:46+5:30

Prakash Hasabe Accident In Pune : कर्मचाऱ्यांना दोन तासात पुन्हा कामावर परत येतो असे सांगून हसबे कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गावरून जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला.

Accidental death of cantonment board officer Prakash Hasabe in Pune | Pune Fashion Street Market Fire : दुर्दैवी! आग विझवण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न; घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

Pune Fashion Street Market Fire : दुर्दैवी! आग विझवण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न; घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

Next

पुणे - पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला (Pune Fashion Street Market Fire) रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक दुकाने जळून खाक झाली, अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, साधारण २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र याच दरम्यान अनेकांचे जीव वाचवून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करुन घरी निघालेल्या कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

आग विझवून घरी जात असताना रस्त्यात अपघात होऊन प्रकाश हसबे मृत्युमुखी पडले. काल मध्यरात्रीच्या सुमारास कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली. त्यानंतर कॅम्प सहीत पुणे शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. ही आग विझवण्यासाठीच्या सगळ्या मोहीमेत पुढे होते ते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश हसबे (Prakash Hasabe). आग विझल्यानंतर ते पहाटे घरी जायला निघाले. मात्र रस्त्यातच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. यामध्येच प्रकाश हसबे यांचे आज दुर्देवी अपघाताने निधन झाले. 

काल रात्री लागलेल्या फॅशन मार्केटच्या आगीचा सकाळी आढावा घेऊन हसबे हे घरी निघाले होते. कर्मचाऱ्यांना दोन तासात पुन्हा कामावर परत येतो असे सांगून ते कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गावरून जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. कॅम्प परिसरातलीच आगीची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्ये देखील आग लागली होती. पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीट हे प्रसिद्ध कपड्यांचे मार्केट आहे. अत्यंत तोकड्या जागेत असलेले हे मार्केट अनेक पुणेकरांचे आकर्षण राहिलं आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासुन हे मार्केट इथून हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आग नेमकी लागली कशी याची चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

Pune Fashion Street Market Fire: पुणे फॅशन स्ट्रीटला लागलेली आग आटोक्यात; लाखोंचं नुकसान, आगीतून निघतायेत संशयाचे धूर   

लोकमतशी बोलताना एक व्यापारी म्हणाले “आग लागल्यानंतर आम्ही लगेचच फायर ब्रिगेडला कळवले. मात्र जवळपास दीड तासाने फायर ब्रिगेड इथे दाखल झाले. त्यामुळे जास्त नुकसान झाले आहे, या ठिकाणी कोणती खाऊ गल्ली नाही. साधी चहाची टपरी देखील नाही. त्यामुळे इथे आग लागली तरी कशी हा प्रश्न आहे. आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता  आहे” असे आणखी एका व्यापाऱ्यांनी सांगितले. ११ च्या सुमारास ही आग लागलेली असताना बघता बघता संपूर्ण मार्केट जळून खाक झाले, आगीचे गोळे आकाशात दूरवर दिसत होते, अंदाजे २००० च्या वर कपडे, चप्पल, गॉगलची दुकाने आहेत, काही मिनिटांतच संपूर्ण मार्केट जळून खाक, २००० साली एम जी रोड वरील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी १ वर्षाच्या कालावधीपुरतं फॅशन स्ट्रीट (जुने कांबळे मैदान) याठिकानी जागा देण्यात आली होती. त्याचे आजतागायत नूतनीकरण झालेले नाही त्यावेळी व्यापाऱ्यांची संख्या ४०० होती, आज हीच संख्या २ हजाराहून अधिक झाली आहे. पार्किंगमध्येही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत दुकाने थाटण्यात आली होती, येथे अनेक व्यापारी संघटना अस्तित्वात आहे.

Web Title: Accidental death of cantonment board officer Prakash Hasabe in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.