आग विझवून घरी परतताना अग्निशमन अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:45+5:302021-03-28T04:10:45+5:30
पुणे : लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात मध्यरात्री लागलेली आग आटोक्यात आणून शनिवारी (दि. २७) सकाळी घरी परतणारे कॅटोंन्मेंट ...
पुणे : लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात मध्यरात्री लागलेली आग आटोक्यात आणून शनिवारी (दि. २७) सकाळी घरी परतणारे कॅटोंन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे अधीक्षक प्रकाश हसबे (वय ५६) यांचा पीएमपी बसने धडक दिल्याने मृत्यू झाला. हसबे यांच्यामागे पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातू असा परिवार आहे.
हसबे हे हवाई दलात होते. तेथील सेवाकाल पूर्ण केल्यानंतर ते २००४ मध्ये कँटोंन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलात रुजू झाले. ते मुळचे सांगली जिल्ह्यातील विटा परिसरातील हिरवे गावचे रहिवासी आहेत.
फॅशन स्ट्रीट परिसरात शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणावर आग लागून सुमारे साडेपाचशे स्टॉल भस्मसात झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आल्यानंतर पहाटेपर्यंत प्रकाश हसबे हे तेथेच होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हसबे आणि जवान अग्निशमन केंद्रात आले. त्यावेळी घरी जाऊन आंघोळ करुन पुन्हा परत येतो, असे सांगून हसबे दुचाकीवरुन त्यांच्या घरी निघाले. येरवडा भागातील नागपूर चाळ ओलांडल्यानंतर काही अंतरावर समोरुन येणाऱ्या पीएमपी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
चौकट
चहा न घेताच गेले
रात्रभर फॅशन स्ट्रीट येथे आग विझविण्याचे काम केल्यानंतर हसबे व त्यांचे सहकारी जवान पहाटे अग्निशमन केंद्रावर परतले. यावेळी जवान दिनेश शिंदे यांनी त्यांना ‘चहा प्यायचा का’ अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी ‘मी घरी जाऊन अंघोळ करुन येतो. पुन्हा काम करायचे आहे,’ असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या अपघाती मृत्यूचीच बातमी समजली. त्यामुळे त्यांच्या जवानांना अश्रू अनावर झाले.