वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीचा अपघाती मृत्यू; अवयवदानाने ६ जणांना जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:46 IST2024-12-20T13:46:04+5:302024-12-20T13:46:35+5:30
कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर तिचे हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंडाची यशस्वीरीत्या व्यक्तींना जीवनदान मिळाले

वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीचा अपघाती मृत्यू; अवयवदानाने ६ जणांना जीवनदान
पुणे : बारामतीत वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा ९ डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला. यात दोघे गंभीर जखमी होते. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय चेष्टा बिश्नोई या शिकाऊ वैमानिक असलेल्या युवतीचा बुधवारी (दि. १८) रोजी शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र तिच्या मृत्यूनंतरही तिने जाताना सहाजणांना जीवनदान दिले असल्याची माहिती पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
काही जण गेल्यानंतरही अनेकांना जीवनदान देऊन जात असतात. तसाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. बारामती येथे वैमानिक होण्याचे स्वप्न घेऊन आलेली राजस्थानच्या जैसलमेर पोखरणच्या खेतोलाई गावात राहणाऱ्या २१ वर्षीय चेष्टा हिचा दि. ९ रोजी अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे तिच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ते उपचार अयशस्वी ठरले. त्यानंतर तिच्या घरच्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यातून सहाजणांना जीवनदान मिळाले आहे. यामध्ये पाच अवयव असून, यकृताचे विभाजन करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर तिच्या अवयव प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. यातील तीन अवयव रुबी हॉल क्लिनिक याठिकाणी देण्यात आले, तर दोन अवयव डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये देण्यात आले असून, यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच प्रत्यारोपण करण्यात आलेल्या रुग्णांची तब्येत स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
राजस्थानमधील जयपूर येथील २१ वर्षीय वैमानिक प्रशिक्षणार्थीला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाकडून पूर्ण प्रयत्न करूनही तिची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या घरच्यांच्या निर्णयामुळे पाच अवयव प्रत्यारोपित केले गेले आणि ६ जीव वाचवू शकलो. (यकृताचे विभाजन करून दोन व्यक्तींमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले.) अवयवांचे वाटप पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियम आणि देखरेखीनुसार केले गेले. तिचे हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंडाचे यशस्वीरीत्या व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे. - डॉ. प्रसाद मुगळीकर, वैद्यकीय संचालक, रुबी हॉल क्लिनिक