विश्रांतवाडीत रिक्षाचा भीषण अपघात; मद्यधुंद अवस्थेतील रिक्षाचालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 12:55 IST2022-01-05T12:52:09+5:302022-01-05T12:55:35+5:30
नेमका अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही

विश्रांतवाडीत रिक्षाचा भीषण अपघात; मद्यधुंद अवस्थेतील रिक्षाचालकाचा मृत्यू
येरवडा: मद्यधुंद अवस्थेतील रिक्षाचालकाचा विश्रांतवाडी येथे झालेल्या अपघातात उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. बाबा दादाराव सकट (वय 30, रा. गोसावी वस्ती, हडपसर) या रिक्षाचालकाचा या विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अनिल उसूलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास रिक्षा क्रमांक (एम एच 12 आरपी 26 33) हिचा आळंदी रस्त्यावरील म्हस्केवस्ती येथे अपघात झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. त्यानुसार तात्काळ घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी अवस्थेतील रिक्षाचालकाला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
रिक्षाचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. नेमका अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.