भावाच्या दशक्रियेसाठी आलेल्या बहिणीचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:49+5:302021-06-06T04:08:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : कोरोनाने मृत्यू झालेल्या भावाच्या दशक्रिया विधीसाठी पतीसह निघालेल्या बहिणीच्या दुचाकीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : कोरोनाने मृत्यू झालेल्या भावाच्या दशक्रिया विधीसाठी पतीसह निघालेल्या बहिणीच्या दुचाकीस पाठीमागून आलेल्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बहिणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथे घडली. लता पांडुरंग धुमाळ (वय ४८) असे मृत्युमुखी पडलेल्या बहिणीचे नाव आहे. तर त्यांचे पती पांडुरंग धुमाळ हे जखमी झाले.
कारचालक गौरव गौतम शिवशरण (वय २१, रा. देगाव, दफळेकर नगर, सोलापूर) यास सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: लता दुधाळ यांचे भाऊ अजय विजय गोरे यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या दशक्रियेसाठी त्या पतीसह दुचाकीवरून अनगर, (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथे निघाल्या होत्या. शुक्रवारी (दि. ४) सकाळी ६ च्या सुमारास ते पुणे - सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथील धुकटे फर्निचर समोर आले पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका मोटारीने त्यांच्या पाठीमागून धडक दिली. यावेळी लता या खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. चालक शिवशरण हा अपघातानंतर फरार झाला. स्थानिकांनी दोघांना तातडीने उपचारासाठी रिक्षातून लोणीकाळभोर येथील विश्वराज रुग्णालयात पाठवले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालक फरार झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघात घडलेल्या ठिकाणा जवळील सीसीटीव्ही तपासले असता अपघात कैद झाल्याचे दिसले. त्यानंतर पवार यांनी ८ तासांच्या आत गौरव गौतम शिवशरण यास सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे.
फोटो - मयत लता पांडुरंग धुमाळ