महावितरणच्या दुर्लक्षामुळे दुर्घटनेचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:08 AM2018-08-30T00:08:58+5:302018-08-30T00:09:45+5:30
साहित्याचे होतेय नुकसान : जागोजागी वाकलेले खांब, उघडे डीपी; ‘वायरमन दाखवा बक्षीस मिळवा’ स्थिती
दावडी : ‘अचूकता’, ‘सचोटीपूर्ण सेवा’, ‘ग्राहकांची सुरक्षा’ हे विषय महावितरणसारख्या मोठ्या विद्युत कंपनीला अद्यापही उमगलेले दिसत नाहीत. पुणे जिल्ह्यामध्ये गावोगावी उघडे डीपी, वाकलेले खांब, वेलींनी वेढलेले खांब, लोंबकळत असलेल्या विद्युतवाहिन्या पाहायला मिळत आहेत. यामुळे दुर्घटना घडून जीविताची किंवा पशुधनाची हानी होण्याची शक्यता आहे. अनेकदा शेतांमध्ये विद्युत वाहिन्यांच्या तारांचे घर्षण होऊन आग लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. महावितरणच्या या उदासीन धोरणामुळे जीव मुठीत घेऊन शेतक ऱ्यांना शेतात काम करावे लागते.
खेड तालुक्यातील दावडी परिसरातील अनेक भागांत असेच चित्र पाहावयास मिळते. मुळातच भरपावसाळ्यात सतत खंडिीत होणाºया वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच ठिकठिकाणी विजेचे खांब झाडावेलींनी लपटलेले आहेत. फ्यूज पेट्या सताड उघड्या पडल्या आहेत. विजेचे खांब वाकलेले आहेत. खरपुडी, दावडी, निमगाव, मांजरेवाडी या परिसरात अनेक ठिकाणी २० ते २५ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या डीपी बॉक्सची अवस्था बिकट झाली आहे. फुटलेल्या फ्यूज पेट्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांचे दरवाजेही मोडून पडले आहेत. पावसाळ्यात अनेक वेळा बॉक्समधून विजेच्या ठिणग्या बाहेर येतात. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. बॉक्सला गंज चढला आहे. येथील वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांकडून दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात वारवांर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. पावसाळ्यापूर्वी गंजलेल्या डीपी, फ्यूजपेट्या बदलणे आवश्यक असते, तसेच वीजवाहक तारांना घासणारी झाडे तोडून टाकण्यात येत नाहीत. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा बंद होतो. मात्र, याकडेही दुर्लक्ष केले जाते.
डीपीच्या फ्यूज पेटीमधील फ्यूज गेला तर वायरमनही लवकर उपलब्ध होत नाही. नाइलाजास्तव ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून तुटलेले फ्यूज स्वत:च बदलावे लागतात. उघडे असलेले डीपी बॉक्समधील तुटलेले फ्यूज काढून नव्याने टाकण्याची गरज आहे. जंप
बदलणे, वीजतारांवरील पावडर काढणे, वीजवाहक तारांना अडथळा ठरणाºया झाडेवेली काढणे, इन्स्युलेटर बदलणे जमिनीपासून उंचीवर वीजवाहक तारा ओढणे, वाकलेले खांब पुन्हा सरळ करणे, बंद असलेल्या वीजवाहक तारा व खांब काढून टाकणे असे होताना दिसत नाही.
मांजरेवाडी (धर्म), खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, मांजरेवाडी (पिंपळ) मलघेवाडी या परिसरात नेमणूक केलेला ‘वायरमन दाखवा, बक्षीस मिळवा’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. दिवसेंदिवस वीज वितरण कंपनीकडून भरमसाट वीजबिले ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार सुरू आहे. अपेक्षित सेवासुविधा पुरविल्या जात नसताना वीज कंपनीकडून जबरदस्तीने वसुली केली जात आहे. ना सुरळीत वीजपुरवठा, ना वायरमनचा पत्ता अशी अवस्था या परिसराची आहे.
परिसरातील फ्यूजपेट्यांची दुरुस्ती करावी, नवीन फ्यूज टाकावेत, विद्युतवाहिन्यांना पडलेला झाडवेलींचा विळखा काढून डीपी बॉक्सची अनेक वर्षांपासूनची दयनीय अवस्था दूर करावी. महावितरणने ग्रामस्थांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. - अनिता मांजरे, सरपंच, संयुक्त ग्रामपंचायत मांजरेवाडी
रेटवडी येथे वर्षभरापूर्वी
वीजवाहक तार विहिरीत पडल्याने पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. खरपुडी येथेही पावसाळ्यात शेतात वीजवाहक तार पडल्याने गुरांना गवत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा त्यावर पाय पडून जागीच मृत्यू झाला होता.
काही महिन्यांपूर्वी बुट्टेवाडी येथे शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. तसेच, दावडी येथेही वीजतारेचे घर्षण होऊन पॉलिहाऊसने पेट घेतल्याची घटनाही घडली होती. अनेक ऊस पेटून शेतकºयांचे नुकसान झाल्याच्या घटना
घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी दावडी येथे बांधावर चरत असलेली गाय तारेवर पाय पडून मृत्युमुखी पडली होती.