पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By श्रीकिशन काळे | Published: July 4, 2024 02:33 PM2024-07-04T14:33:31+5:302024-07-04T14:34:59+5:30

पर्यटन स्थळांवर बंदी हा अपघात रोखण्यासाठीचा उपाय होऊ शकत नाही, जबाबदारी झटकून टाकण्याची ही पळवाट, निसर्गप्रेमींचे मत

accidents at tourist sites Now where to go for a walk Ban on these places District Collector's decision in pune | पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पर्यटन स्थळांवर अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. त्या दृष्टीने वन विभागाच्या वतीने किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य आदी ठिकाणांवर पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे पावसाळा असूनही पर्यटकांना फिरण्याचा आनंद लुटता येणार नाही. पण गर्दीवरील नियंत्रण ठेवून पर्यटन सुरू ठेवायला हवे, अशी मागणी देखील होत आहे.

सध्या पाऊस चांगलाच सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु, योग्य काळजी न घेता व्हिडिओ काढण्याच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परिणामी प्रशासनाला सर्व ठिकाणांवर बंदी घालावी लागली आहे. गेल्या महिनाभरात कळसुबाई शिखरावर दोन वेळा पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. मागील रविवारी तर एका पर्यटकाचा ह्रदयविकाराने मृत्यू देखील झाला आहे. तोरणा किल्ल्यावरही एका पर्यटकाचा जीव गेला. तसेच ताम्हिणी अभयारण्यातील दोन धबधब्यांमध्ये तीन पर्यटक वाहून गेले. भुशी धरणाच्या धबधब्यावर पाच जण वाहून गेल्याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला. या घटनांवरून पर्यटन स्थळांवरील गर्दी नियंत्रिण करणे आवश्यक बनले आहे. तसेच पर्यटकांनी देखील पर्यटन करताना योग्य भान ठेवणे गरजेचे आहे.

विधानसभेतही प्रश्न !

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्था दिसून येत नाही. त्या ठिकाणच्या व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे, अशी मागणी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली आहे.

सरसकट बंदी नको !

दरवर्षी हरिश्चंद्र गडावर, किल्ले सिंहगड, राजगड, सांदण व्हॅली, हरिहर गड, तोरणा येथे गर्दी होते. त्या ठिकाणचे अपघात टाळायचे असतील तर गर्दीवर नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी, लोणावळा, ताम्हिणी भागातले धबधबे पाहण्यासाठी गर्दी होते. पण तिथे वन विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे या सरसकट बंदीवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. ज्यांचा पर्यटनावर व्यवसाय आहे, त्यांची याविषयी मागणी आहे.

पर्यटन स्थळांवर गर्दी होत आहे. अनेक अपघात झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच पर्यटन स्थळांवर निर्बंध आणले आहेत. किल्ले सिंहगडावर १४४ कलम लागू असून, जमावाने जाण्यावर बंदी आहे. - प्रदीप संकपाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी

वन विभागाच्या अंतर्गत अनेक किल्ले व पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन येताना स्वत:च्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य द्यावे. वन्यजीव क्षेत्रात रात्री जाऊ नये, प्राण्यांना त्रास देऊ नये. धोकादायक ठिकाणी जाऊ नये. अन्यथा आम्ही कठोर कारवाई करू. - महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग


पर्यटन स्थळांवर बंदी हा अपघात रोखण्यासाठीचा उपाय होऊ शकत नाही. जबाबदारी झटकून टाकण्याची ही पळवाट आहे. जंगलातले कायदे मोडून वाघ दाखवणाऱ्यांना, शिक्षा न करता, सफारीच बंद करण्यासारखे आहे. होमगार्डसची मदत घेऊन, प्रवेशाच्या वेळी सक्त ताकीद देऊन, मोठ्या दंडाची/शिक्षेची भिती घालावी, पर्यटकांना सुरवातीलाच शिस्त लावावी. जे खरेच निसर्गप्रेमी आहेत, त्यांना या बंदीमुळे वंचित राहावे लागणार नाही. - सीमा देवधर, निसर्गप्रेमी

घरातून बाहेर पडताना ज्या स्थळी जायचे आहे, त्या स्थळापासून आपल्याला काय हवे आहे ह्याचा विचार करावा. सिंहगडला हजारो लोकं जातात, ते तिथे केवळ भाकरी पिठलं, भजी खायला अन् पाऊस, वारा अनुभवायला जातात. तसेच सेल्फी, रील्स काढतात. तिथला इतिहास किती जण जाणून घेतात. काजवा महोत्सवात काजवे मारायचे, कास पठारावर फुले मारायची, किल्ल्यांवर दारू पार्ट्या करायच्या, रिल काढायला वाटेल तिथे, वाटेल तसे जायचे, आणि मग पोलीस, वनविभाग ह्यांना कामाला लावायचे. हे कसले पर्यटन ? खरंतर जबाबदारीने पर्यटन करण्यासाठी एक व्यवस्था तयार व्हावी. पर्यटकांनी योग्य भान ठेवून फिरावे. - केदार पाटणकर, संस्थापक, ट्रास टॉक ग्रुप (किल्ले स्वच्छता मोहिम)
 

Web Title: accidents at tourist sites Now where to go for a walk Ban on these places District Collector's decision in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.