खड्ड्यांमुळे वाढले अपघात
By admin | Published: August 29, 2014 04:37 AM2014-08-29T04:37:33+5:302014-08-29T04:37:33+5:30
गेल्या आठवड्याभरापासून सकाळी उकाडा आणि दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठले आहे
हडपसर : गेल्या आठवड्याभरापासून सकाळी उकाडा आणि दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठले आहे. रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे दुचाकीच्या अपघातांत वाढ झाली असून, वाहनांचा वेगही मंदावला आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याची अद्याप तसदी घेतली नाही. आकाशवाणी ते लक्ष्मी कॉलनीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर नागरिकांना पायी चालण्यासाठी रस्ता मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर रस्त्याचे काम रखडले असून, अद्याप त्याला गती आली नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी काही दिवस काम गतीने केले, त्यानंतर अर्धवट राहिलेले काम बंद पडले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरीक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
झोपडपट्टीमधील नागरिकांना मध्यरात्रीपासून लहानग्यांना घेऊन कॉटवर बसावे लागले. संसार पाण्यात गेल्याने झोपडपट्टीधारकांचे मोठे नुकसान झाले. शाळा-महाविद्यालयांच्या मैदानावर तसेच उद्यानामध्येही पाण्याचे तळे साठले होते. भाजी मंडईमध्ये पाणी साठल्याने भाजी विक्रेत्यांची मोठी अडचण झाली. रवीदर्शन समोर पाणी जाण्यासाठी पावसाळी गटारयोजना नसल्यामुळे दोन फूट पाणी साठले होते, वैदूवाडी चौक, रामटेकडीच्या पुलाच्या बाजूला, तसेच फातिमानगर चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. बैठ्या घरांमध्येही पाणी शिरले होते. जुन्या पद्धतीच्या घरांच्या छप्परातून पाणी गळत होते. (वार्ताहर)