सीसीटीव्ही अन् कारवाईमुळे सलग तिसऱ्या वर्षी घटले अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:15 PM2020-01-04T15:15:46+5:302020-01-04T15:38:42+5:30
रस्ते सुरक्षेचे सातत्याने धडे : हेल्मेट कारवाईचाही परिणाम
पुणे : अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण सलग तिसऱ्या वर्षी कमी झाले आहे. २०१७ मध्ये जीवितहानी झालेल्या अपघातांची संख्या ३६० एवढी होती. त्यामध्ये मागील दोन वर्षांत अनुक्रमे २४० व १९९ पर्यंत घट झाली आहे. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्याही त्याच प्रमाणात खाली आली आहे. एकूण अपघातांमध्ये तीन वर्षांत जवळपास निम्म्याने घट झाल्याचे चित्र आहे. वाहनचालकांवर सीसीटीव्हींची नजर, वाहतूक नियमांमुळे जनजागृती आणि कारवाईमुळे वाहनचालक नियमात वाहने चालवित आहेत. परिणामी अपघात कमी होत आहेत.
मागील काही वर्षांत शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत गेली. ही संख्या जशी वाढत गेली, तसे अपघातांचे प्रमाणही वाढले. वाहतुकीचा वेग मंदावला असला तरी बेशिस्तपणा वाढत गेला. अनेक वाहनचालक सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडत असल्याचे दृश्य सर्वच रस्त्यांवर पाहायला मिळते. अनेक रस्त्यांची अवस्थाही फारशी चांगली नाही. या विविध कारणांमुळे शहरात दररोज अपघात घडतात. त्यातील काही अपघात गंभीर स्वरूपाचे असून अनेकांचा मृत्यू होत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये डिसेंबरअखेरपर्यंत एकूण १९९ मोठे अपघात झाले. त्यामध्ये २०६ जणांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये हा आकडा अनुक्रमे २४० व २५३ एवढा होता. तर २०१७ मध्ये ३६० जीवघेणे अपघात झाले होते. मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवरून या अपघातांचे प्रमाण घटत असल्याचे स्पष्टपणे दिसते.
शहरात २०१७ मध्ये एकूण १५०७ अपघात झाले होते. त्यापैकी सर्वाधिक ६०७ अपघात गंभीर स्वरूपाचे असून त्यामध्ये ७१० जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. या अपघातांचा आकडा २०१८नंतर जवळपास निम्म्याने कमी झाला. किरकोळ स्वरूपाच्या अपघातांमध्येही लक्षणीय घट झाली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या विविध उपाययोजनांमध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
......
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
रस्ते सुरक्षेसंदर्भात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नियमांचे पालन करणाऱ्या चालकांसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आल्या असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
हेल्मेट कारवाईमुळे हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याबरोबरच जीवितहानीचे प्रमाणही घटले आहे.
.........
शहरातील सर्व प्रकारच्या अपघातांची स्थिती
अपघात वर्ष
२०१७ २०१८ २०१९
जीवघेणे अपघात ३६० २४० १९९
मृत्यू ३७३ २५३ २०६
गंभीर अपघात ६०७ ३८९ ३४५ (नोव्हें.पर्यंत)
गंभीर जखमी ७१० ४६६ ४१०
किरकोळ अपघात ३५८ १७८ १२७ (नोव्हें.पर्यंत)
जखमी ४४१ २२५ १४६
जखमी नसलेले अपघात १८२ ९२ ६० (नोव्हें.पर्यंत)
एकूण अपघात १५०७ ८९९ ७३१
......