अपघातग्रस्त सुखोई-३० विमान जैसे थे
By admin | Published: October 16, 2014 06:00 AM2014-10-16T06:00:11+5:302014-10-16T06:00:11+5:30
प्रशिक्षणादरम्यान अपघातग्रस्त झालेले हवाईदलाचे सुखोई ३० हे विमान बुधवारी जैसे थे होते.
वाघोली : प्रशिक्षणादरम्यान अपघातग्रस्त झालेले हवाईदलाचे सुखोई ३० हे विमान बुधवारी जैसे थे होते. दिवसभर हवाईदलाच्या तुकडीने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता व हवाईदलाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने पंचनामा करण्याचे काम सुरू होते. अपघातग्रस्त विमान पाहण्यासाठी आजदेखील असंख्य नागरिक परिसरामध्ये गर्दी करीत होते.
केसनंद गावाजवळील कोलवडी येथील साळुंकेमळा परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी ५.४५च्या सुमारास हवाईदलाचे सुखोई ३० हे विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले होते. उसाच्या शेतामध्ये पडलेल्या या विमानाच्या पुढच्या भागाला तडा जाऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही वेळात ग्रामस्थांनी विमानाच्या मागच्या बाजूला माती व पाणी मारून आग आटोक्यात आणली होती. अपघाताची घटना घडताच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी विमान पाहण्यासाठी गर्दी केली होती. ग्रामीण पोलीस व हवाईदलाच्या तुकडीने गर्दी हटवून विमानाच्या भोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी रात्रीपासून तळ ठोकून असणाऱ्या हवाईदलाच्या तुकडीने संबंधित विमान व परिसर सील केला आहे. परिसरामध्ये कोणालाही फिरकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बुधवारी दिवसभर हे अधिकारी पंचनामा करीत होते.
अपघातग्रस्त विमान जैसे थेच असून, ते हलविण्यासंदर्भात कोणतेही पाउल हवाईदलाच्या वतीने बुधवारी सायंकाळपर्यंत उचलण्यात आले नव्हते. पोलीस व हवाईदलाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही या परिसरामध्ये येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तरी, नागरिकांना अपघातग्रस्त विमान पाहण्याची उत्सुकता लागल्याने जागा मिळेल त्या दिशेने ते पाहण्यासाठी पुढे जात आहेत. मात्र, नागरिकांना परिसरातून हकलण्यासाठी पोलीस व हवाईदलाला चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. (वार्ताहर)