भाकणुकीच्या कार्यक्रमाने बाबीर यात्रेची सांगता, बाळाला झोका देऊन फेडला नवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:14 PM2018-11-10T23:14:11+5:302018-11-10T23:14:41+5:30
परंपरेला फाटा : बाळाला झोका देऊन फेडला नवस
कळस : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर देवाच्या यात्रेची शनिवारी (दि. १०) भाकणुकीच्या कार्यक्रमाने सांगता झाली; तसेच गेल्या दोन वर्षांपासून येथील अघोरी बगाड प्रथा बंद केली आहे, त्याऐवजी नवसाच्या बाळाला मंदिरासमोर झोका देऊन नवस फेडला गेला.
यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविकांनी यात्राकाळात देवदर्शनासाठी हजेरी लावली. यात्राकाळात सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी देवदर्शनासाठी हजेरी लावल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षअजितसिंह पाटील व सरपंच रूपाली आकाश कांबळे यांनी दिली. दिवाळी पाडव्यादिवशी देवाचा घट हलविल्यानंतर यात्रेस सुरुवात झाली. या वेळी गावातून देवाच्या पालखीने मंदिराकडे प्रस्थान ठेवले. गुलालाची उधळण, तोफांची सलामी व ढोलच्या निनादात पालखी मंदिरस्थळी आली. यानंतर भाविकांनी देवदर्शनासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली. शुक्रवार हा यात्रेचा मुख्य दिवस होता. या वेळी देवदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभर नवस परतफेडीचा कार्यक्रम झाला. आज सकाळी बगाड व भाकणूक व पकाळणीचा कार्यक्रम झाला. महिलांनी यात्रेमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते. यात्रेसाठी आकाश कांबळे, यशवंत कचरे, शेखर पाटील, अंकुश लावंड, तानाजी मारकड, पांडुरंग डोंबाळे, रवि शिंदे, नानासो थोरात यांनी परिश्रम घेतले.
तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, पोलीस निरीक्षक अरविंद काटे, ग्रामपंचायतींच्या सरपंच रूपाली आकाश कांबळे व देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या
यामुळे ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केले.