साखळी चोरीत आकडेवारीनुसार घट
By admin | Published: August 31, 2015 04:14 AM2015-08-31T04:14:34+5:302015-08-31T04:14:34+5:30
गेल्या काही वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत
पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल १०० ने घटले आहेत. नुकतेच पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांकडून पकडलेला ऐवज ६० महिलांना सुपूर्द केला. गेल्या वर्षी आॅगस्टअखेरीस ३६७ गुन्हे घडले होते; तर चालू वर्षात आॅगस्टअखेरीस २६७ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.
साखळी चोरीच्या यातील १४७ गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी ३७ आरोपींना अटक केली आहे. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविलेल्या छापासत्रामुळे या गुन्ह्यांचा आलेख खाली आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली आहे.
पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद यांनी योजना तयार करून राज्यातील सोनसाखळीचोरी करणाऱ्या ‘इराणी’ चोरट्यांच्या वस्त्यांची माहिती काढली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी पथके तयार करून नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, मुंब्रा, नेरुळ, परळी वैजनाथ, पुण्यातील शिवाजीनगर आदी भागांमध्ये छापे टाकले.
या ठिकाणांहून रेकॉर्डवरील तसेच सराईत सोनसाखळी चोरटे
ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान
काही चोरट्यांकडून सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले.
गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी १४७ गुन्हे उघडकीस आणले.
गुन्हे उघडकीस आणण्याचे
प्रमाण तसेच गुन्हे कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यासोबतच शहरातील रस्त्यांचा अभ्यास करून
पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये
फिरून नाकाबंदी पॉर्इंट
निश्चित केले. नाकाबंदीदरम्यान नेमक्या कोणत्या दुचाकी आणि
चारचाकी तपासायच्या याच्या
सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी स्थानिक पोलिसांकडून सुरू
आहे. यासोबतच सोनसाखळी चोरट्यांच्या मोठ्या टोळ्याच
गजाआड करण्यात यश आल्यामुळे गुन्हे घटले आहेत.
नागरिकही करतात प्रतिकार
बहिणीसह शतपावली करण्यासाठी जात असलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना या महिलेने तीन सोनसाखळी चोरट्यांना पकडून चोप द्यायला सुरुवात केली. गर्दी जमा होऊ लागताच हे तिघेही चोरटे पसार झाल्याची घटना बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर नुकतीच घडली होती.
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या आणि तरुणींच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. दोनच दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ७८ वर्षीय वृद्धेला खाली पाडून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली. या घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटना रोखण्यात कमी पडत असलेल्या पोलिसांवर नाराजी व्यक्त होत होती. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोनसाखळी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला होता. आयुक्त पाठक यांनी याची गंभीर दखल घेत चोरट्यांचा बंदोबस्त करून हे गुन्हे कमी करण्यासाठी नागपूरमध्ये राबवलेल्या उपाययोजना पुण्यात राबवणार असल्याचे स्पष्ट केले होते.
सोनसाखळी चोरट्यांनी गेल्या चार वर्षांत तब्बल ९ कोटी ९१ लाख ५८ हजार ८८२ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यातील केवळ २ कोटी ८९ लाख ६५ हजार २५३ रुपयांचाच ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चार वर्षांमध्ये पोलिसांनी ४१० गुन्हेगारांना अटक केली असून यातील २८ आरोपी अल्पवयीन आहेत.
पोलीस आयुक्त के. के. पाठक, पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांच्या सूचनांनुसार गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार करून राज्यातील विविध भागांमध्ये वारंवार छापे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या पुण्यातील हालचाली कमी झाल्या आहेत. यासोबतच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास आता थेट पोलीस निरीक्षक करणार असल्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिल्यामुळे तपासात प्रगती होत आहे.
- पी. आर. पाटील (उपायुक्त, गुन्हे शाखा) (प्रतिनिधी)