सेट परीक्षा बदललेल्या अभ्यासक्रमानुसार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:51 AM2019-02-01T05:51:56+5:302019-02-01T05:53:08+5:30
सहायक प्राध्यापक पदासाठी होणाऱ्या सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
पुणे : सहायक प्राध्यापक पदासाठी होणाऱ्या सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती सेट परीक्षा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्याकरिता सेट परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून केले जाते. आगामी सेट परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना १ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार अभ्यासक्रमांमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार सेट परीक्षेचे दोनच पेपर असतील. पेपर क्र.१ हा जनरल असेल आणि पेपर क्र. २ हा संबंधित विषयाचा असेल, अशी माहिती सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली आहे.
आॅनलाइन चुका दुरुस्त करण्याची मुदत २२ ते २८ फेब्रुवारी २०१९ आहे. याबाबत काही शंका असल्यास सेट परीक्षा विभागाशी दूरध्वनी क्रमांक ०२०-२५६९२५२७, २५६०१२९० यावर संपर्क साधावा, असे कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे.
सेट परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा अशा एकूण १५ शहरांमधील महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे ३२ विषयांसाठी होणार आहे.