डॅशबोर्डनूसार व्हेंटिलेटर बेड नाहीत उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:08+5:302021-04-05T04:09:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिका हद्दीतील महापालिकेच्या, शासनाच्या तथा खाजगी रूग्णालयांमधील एकाही रूग्णालयामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील महापालिकेच्या, शासनाच्या तथा खाजगी रूग्णालयांमधील एकाही रूग्णालयामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजता एकही व्हेंटिलेटर बेड (खाटा) शिल्लक नसल्याची नोंद आहे़ त्यातच ज्या उपलब्ध बेडच्या नोंदी आहेत, त्या मिळाव्यात याकरिता संपर्क केला असता डॅशबोर्डवर माहिती भरायची राहून गेली आहे़ असे उत्तर देऊन आत्ताच सर्व बेड फूल झाले आहेत, असे उत्तर खाजगी रूग्णालयांकडून दिले जात आहे़
शहरातील बहुतांशी रूग्णालयांमध्ये सध्या आॅक्सिजन बेडची तथा व्हेंटिलेटर बेडची वणवा असून, आॅक्सिजन बेडसाठी पहिल्यापासूनच वेटिंग आहे़ तुम्हाला आम्ही बेड कुठून देऊ असे उत्तर दिले जात आहे़ तर महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये अथवा जम्बो रूग्णालयात संपर्क साधण्याचा सल्लाही मिळत आहे़ यावेळी महापालिकेच्या वॉर रूमशी संपर्क साधल्यास येथे नावनोंदणी करून घेतली जात असून, बेड उपलब्ध झाल्यावर लागलीच कळविले जाईल असे उत्तर मिळत आहेत़ महापालिकेच्या रूग्णालयात कधी तरी सध्या बेड मिळत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी, शहरातील वाढती रूग्णसंख्या व ४० हजारांपर्यत पोहचलेली रूग्णसंख्या यामुळे दिवसेंदिवस बेड मिळविण्याची समस्या वाढू लागली आहे़
महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शहरातील खाजगी रूग्णालयांमधील ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे़ परंतु, संबंधित रूग्णालयांत पहिल्यापासूनच उपचार सुरू असलेल्या रूग्णांना लागलीच बाहेर काढणे अनेकांना अशक्य झाले आहे़ त्यामुळे टप्प्या-टप्प्याने हे बेड कोविड-१९ च्या रूग्णांसाठी राखीव केले जात आहेत़ सद्यस्थितीला पुणे शहरातील (महापालिका, शासन रूगणालयांसह सीसीसी मधील बेड धरून) ७ हजार १६४ बेड कोविड-१९ साठी राखीव आहेत़ यामध्ये आयसोलेशेनकरिता (साधे बेड) २ हजार १११ असून, यापैकी रविवारी ५६८ बेड शिल्लक होते़ शहरात आॅक्सिजन बेड ४ हजार १३७ असून, यापैकी सध्या २६० बेड शिल्लक आहेत़ तर ४३४ आयसीयू बेडपैकी १५ बेड शिल्लक असून, ४८२ व्हेंटिलेटर बेडपैकी एकही बेड शहरात शिल्लक नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोविड-१९ च्या राखीव बेडच्या संकेतस्थळावर दाखविले जात आहे़
------------
दरम्यान या संकेतस्थळावर (डॅशबोर्डवर) खाजगी रूग्णालय उपलब्ध बेडची माहिती अपडेट करीत नसल्याचा आरोप शहर काँग्रेसचे सरचिटणीस ऋषीकेश बालगुडे यांनी केला आहे़ शहरातील प्रत्येक खाजगी रूग्णालयांत महापालिकेने स्वतंत्र अधिकाºयाची नेमणूक करून उपलब्ध बेडची माहिती तातडीने डॅशबोर्डवर अपडेट करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणीही केली आहे़
----------------------------------