आरटीईनुसार नंबर लागला, तरी अद्याप प्रवेश नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:57+5:302021-08-15T04:12:57+5:30
उरुळी कांचन : शिक्षण हक्क कायदानुसार सोडतीद्वारे ज्या विद्यार्थ्यांचे बड्या शाळांमध्ये प्रवेशासाठी नंबर लागले, त्या शाळांना तीन वेळा प्रवेशासाठी ...
उरुळी कांचन : शिक्षण हक्क कायदानुसार सोडतीद्वारे ज्या विद्यार्थ्यांचे बड्या शाळांमध्ये प्रवेशासाठी नंबर लागले, त्या शाळांना तीन वेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनसुद्धा त्या शाळांनी अद्याप मुलांना प्रवेश दिला नाही, तर दुसरीकडे शाळेतील इतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण नियमत सुरू झाले आहेत, त्यामुळे आरटीईनुसार नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. शिवाय, मुलांना शाळा प्रवेश देणार की नाही? याची टांगती तलवार पालकांच्या डोक्यावर आहेच.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवेशानंतरही ऑनलाइन वर्ग सुरू झाले नाही. प्रतीक्षा यादीतील मुलांसाठीची प्रवेशाची प्रक्रिया ऑगस्ट उलटून चालला, तरी झालेली नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जात आहे. ज्या शाळांनी विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश दिला नाही, त्यांच्या विरोधात शिक्षण विभाग कठोर भूमिका घेत नसल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवरील केंद्रीय प्रवेशप्रक्रिया अंतर्गत पहिल्या निवड यादीत नावे जाहीर झाल्यानंतर, पालकांनी आवश्यक ती पूर्तता करून प्रवेश निश्चित केला. मात्र, त्यानंतर दीड महिन्याचा कालावधी लोटला, तरी संबंधित शाळांनी या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू न केल्याने पालकांची चिंता वाढली आहे. जे विद्यार्थी प्रतीक्षायादीत आहेत त्याबाबतही पुढील कोणतेच धोरण स्पष्ट न झाल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यांना आपला प्रवेश होईल का? का वेगळ्या पद्धतीने प्रवेश घ्यावा लागेल या कल्पनेने त्यांच्या काळजीत वाढ झाली आहे, ग्रामीण भागात विशेषत: हा प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे, शिक्षण खात्याचे अधिकारी दररोज वेगवेगळे फतवे काढून पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत.
--
कोट -१
त्या शाळांची तक्रार द्या
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळायलाच हवा, प्रवेश घेऊनही शाळा विद्यार्थ्याचा ऑनलाईन शिक्षणाचा हक्क डावलत असतील, त्या शाळांच्या विरोधात पालकांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
दिनकर टेमकर,
प्राथमिक शिक्षण सहसंचालक
---
८२ हजार नावे अन् ६० हजार प्रवेश
आरटीई प्रवेशाचा राज्याचा तपशील पुढीलप्रमाणे: राज्यामध्ये सुमारे नऊ हजार ४३२ शाळांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला असून, पुण्यामध्ये या शाळांची संख्या ९८५ अशी आहे. राज्यामध्ये एकूण प्रवेशाच्या जागा ९६ हजार ६८४ आहेत पुण्यामध्ये त्यापैकी १४ हजार ७७३ आहेत. पहिल्या यादीत राज्यांमध्ये ८२हजार ११९ मुलांना प्रवेशासाठी निवडण्यात आले होते. आजअखेर राज्यामध्ये ६० हजार ७८७ मुलांनी प्रवेश घेतला आहे,तर पुण्यामध्ये १० हजार ४०५ मुलांनी प्रवेश घेतला अशी परिस्थिती असताना शिक्षण विभाग वेळकाढू धोरण अवलंबून मुलांवर अन्याय करीत आहे. याकडे शिक्षण मंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन सुस्पष्ट शब्दांत आदेश द्यावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.
--