कायद्याप्रमाणे सर्व प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवावेत; भडकवणारी विधाने मात्र बेकायदेशीर-असीम सरोदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 12:22 PM2022-05-02T12:22:52+5:302022-05-02T12:27:38+5:30
औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच भाषणाच्या शेवटी भोंग्याच्या मुद्द्याला हात घातला
पुणे : औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याबरोबरच भाषणाच्या शेवटी भोंग्याच्या मुद्द्याला हात घातला. मागील सभेत राज ठाकरे यांनी मशीदवरील भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. कालच्या सभेत त्यांनी त्यांच्या सणांमध्ये आम्ही विश कालवणार नाही. असे म्हणत ४ तारखेपर्यंत सर्व मशीद वरील भोंगे उतरायला हवेत. अन्यथा त्यांच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच पोलिसांनी लवकरात लवकर याबाबत ठोस पाऊले उचलावीत आणि भोंगे काढण्यासाठी मशिदीला सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यावर कायदेविषयक अभ्यासक असीम सरोदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. कायद्याप्रमाणे प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवले पाहिजेत. मात्र भडकवणारी विधाने ही बेकायदेशीर असल्याची टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
सरोदे म्हणाले. मस्जिद,मंदिर,गुरुद्वारा,जैन व बौद्ध प्रार्थना स्थळे,चर्च सगळ्यांचे भोंगे उतरवले पाहिजेत. हेच आमच्या गोंगाट विरोधी मंचचे 2002 पासून म्हणणे आहे. कायदा सगळ्यांना मानवाच लागतो. सगळ्यांनी मस्जिद,मंदिरे या सगळ्यांनीच भोंगे उतरवावे हे म्हणावेच लागले. इतर भडकविणारी विधाने
बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मस्जिद,मंदिर,गुरुद्वारा,जैन व बौद्ध प्रार्थना स्थळे,चर्च सगळ्यांचे भोंगे उतरवले पाहिजेत हेच आमच्या गोंगाट विरोधी मंचचे 2002 पासून म्हणणे आहे. कायदा सगळ्यांना मानवाच लागतो. सगळ्यांनी मस्जिद,मंदिरे या सगळ्यांनीच भोंगे उतरवावे हे म्हणावेच लागले. इतर भडकविणारी विधाने बेकायदेशीर.
— Asim Sarode (@AsimSarode) May 1, 2022
भोंग्यांच्या भूमिकेबाबत सरोदे यांनी मागितले होते स्पष्टीकरण
आवाजाच्या मर्यादेवर आतापर्यंत देशातील न्यायालयात आठ महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. त्यामध्ये कार्यक्रमातील डिजे, फटाके तसेच चर्च, गुरुद्वारा, मंदिरे, मशीद, यामधील स्पीकर यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणावर प्रतिबंध लावण्यासाठी हे निर्णय दिले होते. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. एका निर्णयात न्यायालयाने शांतता क्षेत्रात ध्वनी प्रदुषण थांबवावे असं सांगितले होते. पण आतापर्यंत शांतता क्षेत्राची व्याख्याच केली नाही. न्यायालयाच्या कोणत्या निर्णयाचा दाखला देऊन मशिदीवरील भोंगे उतरावेत, अशी भूमिका घेतली याबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे असे सरोदे यांनी मागच्या वेळी सांगितले होते.
इतर गोंगाटवेळी कोणी काही बोलत नाही
ख्रिसमस, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आंबेडकर जयंती, विश्वकर्मा जयंती, दत्त जन्म व जयंती, दुर्गाउत्सव, महावीर जयंती, स्वामी बसवेश्वर जयंती, गणपती उत्सव, दिवाळी, लग्न, क्रिकेटची मॅच जिंकणे अश्या अनेक वेळी 'गोंगाट' व उत्सवाच्या प्रदूषित साजरीकरण बंद करण्याबाबत कुणी बोलत नाहीत याबाबतचे अनेक ट्विटही त्यांनी केले होते.