भोसले सहकारी बँकेला वाचवण्याची खातेदारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:45+5:302020-12-04T04:27:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : .? शिवाजीराव भोसले सहकारी बँक गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने बँकेचे सुमारे १ लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : .? शिवाजीराव भोसले सहकारी बँक गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने बँकेचे सुमारे १ लाख खातेदार-ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आयुष्याची पुंजी बँकेत अडकल्याने अनेकजण भिकेला लागले आहेत. त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करुन इतर बँकांप्रमाणेच या बँकेलाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी बँकेच्या खातेदार-ठेवीदार कृती समितीने केली आहे.
समितीचे अशोकलाल शहा यांनी सांगितले की, काही खाजगी क्षेत्रातील बँकांना आर्थिक उभारी देऊन त्यांना न्याय देण्यात आला. मात्र सहकारी बँक अडचणीत आल्यानंतर खातेदारांची कोंडी केली जाते. केवळ सर्वसामान्य, गरीब खातेदार असल्यानेच त्यांच्यावर अन्याय केला जातो का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ४ मे २०१९ पासून निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे खातेदारांना अवघे एक हजार रूपये काढण्याची मुभा आहे. दुसरीकडे संचालक आणि विधानपरिषदेचे सदस्य अनिल भोसले यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने २ कोटी रुपये खात्यावर वर्ग करून घेतले. सर्वसामान्य खातेदारांना मात्र मुलाबाळांची लग्ने, शिक्षण अथवा औषधोपचारासाठीसुद्धा स्वत:चे पैसे काढता येत नाहीत, अशी अवस्था असल्याचे शहा म्हणाले.
आयुष्यभराची कमाई बँकेत अडकल्याने खातेदार मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे सरकारने वेळीच लक्ष घालून सर्वसामान्य खातेदारांना न्याय द्यावा. त्यासाठी बँकेचा कारभार अन्य दर्जेदार बँकांकडे वळवावा. अन्यथा सामान्य खातेदारांना जगणे मुश्किल होईल, असे शहा यांनी सांगितले.