जिल्हा सहकारी बँकेच्या खातेदारांना आता कोणत्याही बँकेतून रक्कम काढता येणार
By श्रीकिशन काळे | Published: March 31, 2023 04:37 PM2023-03-31T16:37:15+5:302023-03-31T16:37:51+5:30
देशातील पहिलाच प्रयोग असून ग्राहकांना देशभरात सुविधा उपलब्ध असणार
पुणे : राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकांना मायक्रो एटीएम म्हणजेच आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम प्रणाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने घेतला आहे. या प्रणालीचा सर्वप्रथम मानकरी होण्याचा मान भंडारा जिल्हा सहकारी बँकेला मिळाला आहे. या सुविधेमुळे देशातील कोणत्याही बँकेतून रक्कम काढता येणार आहे. राज्य बँकेच्या पुणे कार्यालयात बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, नाबार्डचे महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य सरव्यवस्थापक जी. एस. रावत यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
यावेळी नाबार्डच्या सरव्यवस्थापिका रश्मी दराड, राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे उपस्थित होते. टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यातील एकूण २३ जिल्हा बँकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे जिल्हा बँकांच्या ग्राहकांना आधार कार्डद्वारे संपूर्ण देशात कोणत्याही बँकेच्या मायक्रो एटीएमच्या माध्यमातून रक्कम काढणे, रक्कम जमा करणे, फंड ट्रान्सफर करणे, बॅलेन्सची चौकशी करणे, मिनी स्टेटमेंट घेणे यासारख्या सेवा मिळणार आहेत. त्याने केंद्र सरकारच्या वित्तीय समावेशक मोहिमेस हातभार लागणार आहे.
काय आहे नवीन प्रणाली
जिल्हा बँकांना मायक्रो एटीएम म्हणजेच आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम प्रणाली मिळणार आहे. त्यामध्ये ग्राहकांचे आधारकार्ड बँकेशी संलग्न हवे. त्यामुळे देशात कुठेही ग्राहकाला आधार कार्डमुळे आपल्या बँकेत पैसे टाकता येतील किंवा काढता येतील. ग्राहकाला फक्त आपला आधार कार्ड नंबर माहिती असायला हवा किंवा कार्ड सोबत हवे.
''अडचणीतील सहकारी संस्थांच्या पुनर्उभारणीसाठी ४ वर्षांच्या कालावधीची योजनाही सुरू केली आहे. गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी बँके १ एप्रिल २०२३ पासून नवीन योजना आणली असून, ती माहितीसाठी नाबार्डकडे पाठविली आहे. - विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य बँक''