Pune: अकाऊंटंटला दिला बँकेचा ॲक्सेस, त्याने घातला ६३ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 06:07 PM2021-12-16T18:07:04+5:302021-12-16T18:10:54+5:30
गैरफायदा घेत खात्यातून आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुन ६३ लाख २९ हजार ९४१ रुपयांना गंडा...
पुणे : मार्केटयार्ड मधील धान्य बाजारातील एका दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करणाऱ्याला सोयीसाठी मालकाने बँक खात्याचा एक्सेस दिला. त्याचा त्याने गैरफायदा घेत खात्यातून आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुन ६३ लाख २९ हजार ९४१ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी सचिन सुरेश गादिया (वय ४४, रा. बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी उपेशकुमार रामदुलारे परदेशी (वय २७, रा. निंबाळकर वस्ती, खोपडेनगर, कात्रज) याला अटक केली आहे. हा प्रकार एप्रिल २०१८ ते २६ एप्रिल २०२१ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गादिया यांचा मार्केटयार्डमध्ये गाळा आहे. त्यांच्या पुजा साहित्य होलसेल विक्रीच्या दुकानात उपेशकुमार हा अकाऊंटंट म्हणून काम करत होता. त्याला फिर्यादींनी विश्वासाने बँक खात्याचा अॅक्सेस दिला होता. या कालावधीत त्याने या अॅक्सेसचा गैरफायदा घेऊन बँक खात्यातील पैसे पेटीएम, अॅमेझॉन, बीलडेक्स, रोझरपे मर्चंटद्वारे स्वत:च्या पेटीएम खात्यावर घेऊन फसवणूक केली. लेखा परीक्षणाच्या दरम्यान हा प्रकार उघड झाल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. प्राथमिक तपासात त्याने ६३ लाख २९ हजार ९४१ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. पोलीस निरीक्षक ढमढेरे तपास करीत आहेत